
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. असे असताना ठाण्यात आता पुन्हा एकदा शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. ‘शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे’, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मुंब्रा भागात शिवसेना शाखा तोडली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे. बेकायदेशीर सरकार चालवत आहे. त्याच्यावर बुलडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवतात त्यांना लाज वाटत नाही का?, असे त्यांनी म्हटले.
तसेच ‘बाळासाहेबांच्या शाखा आजही निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी बसत आहे. मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण करत आहे आणि तुमच्या मुंब्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळे, बाळासाहेबांचे पुतळे, फोटो असलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहे’.
महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का?
‘महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का? शाखा तोडत आहेत तुमच्यात हिंमत असेल तर समोर या…’ असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे यांना दिलं आहे. शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले. त्यांचा हिशोब होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.