‘मिंधे गटाच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; संजय राऊत यांची खरमरीत टीका

मानेचा पट्टा हा एक आजार असला तरी सध्याच्या मिंधे गटाच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा बांधलेला असून, तो वेदना देणारा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

    नाशिक : मानेचा पट्टा हा एक आजार असला तरी सध्याच्या मिंधे गटाच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा बांधलेला असून, तो वेदना देणारा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

    संजय राऊत हे दोन दिवस नाशिक भेटीवर आले असून, नाशकात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसेनेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडीचा समावेश करण्यात आला आहे.

    महाविकास आघाडीत शिवसेना, दोन्ही काँग्रेस व शेतकरी पक्षाचा समावेश असून, उद्धव ठाकरे व वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची यापूर्वीच आघाडी करण्याबाबत भेट झालेली आहे. त्यांना आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा व निर्णय घेण्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर हे मोदींना पाठिंबा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    अकोल्याची जागा आंबेडकर यांनी लढावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगून राऊत यांनी जागा वाटपाबाबत काँग्रेस हायकमांड यांच्याशी दिल्लीत बोलणी चालू असून, आमचे हायकमांड मुंबईत आहेत तर भाजप व शिंदे यांचे हायकमांड दिल्लीत असल्याचे सांगितले. आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अचानक आजारी पडतात व लगेच बरेही होत असल्याचा टोला लगावला.

    ते काय निर्णय देणार याकडे आमचे लक्ष असून, ज्यांना न्यायनिवाडा करायचा आहे तेच आरोपींना जाऊन भेटत असल्याचा टोलाही त्यांनी नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर लगावला.