
उद्धव ठाकरे यांनी सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच उमेदवारही निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच उमेदवारही निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. तर माढ्याचाही उमेदवार जवळपास निश्चित केला असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाला इंडिया आघाडीमध्ये जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
तयारीला लागण्याचे आदेश
सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंच्यासोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे दिले आदेश देण्यात आले आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूका केव्हाही लागतील आणि उमेदवार कोणीही असू द्या, तयारी करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.