ठाकरे यांनी सोडले वर्षा निवासस्थान; मुख्यमंत्रिपद सोडलं नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री बंगल्यावर जाण्याची तयारीही ठाकरेंनी यावेळी दाखवली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासात मुख्यमंत्री वर्षा बंगला रिकामा करण्याची तयारी केली. परंतु ठाकरेंनी 'वर्षा' सोडलं, मुख्यमंत्रिपद नाही, गरज पडल्यास विधिमंडळात बहुमत सिद्ध करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं.

    मुंबई – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. दरम्यान वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री बंगल्यावर जाण्याची तयारीही ठाकरेंनी यावेळी दाखवली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासात मुख्यमंत्री वर्षा बंगला रिकामा करण्याची तयारी केली. परंतु ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडलं, मुख्यमंत्रिपद नाही, गरज पडल्यास विधिमंडळात बहुमत सिद्ध करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं.

    “मी सकाळपासून इथेच आहे, शरद पवार येऊन गेले, सुप्रिया ताई, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सगळे वर्षा बंगल्यात आहेत. मुख्यमंत्री आता वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर निघाले आहेत. मोह, माया, सत्ता, याचा आम्हाला अजिबात लोभ नाही, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही लढत राहू आणि शेवटी सत्याचा विजय होईल, अशी दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस-राष्ट्रवादी) प्रमुख नेत्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी सद्भावना व्यक्त केल्या. शरद पवार, अशोक चव्हाण, कमल नाथ या सर्वांचे आम्ही आभारी आहोत” असं संजय राऊत म्हणाले.