ठाकरे की शिंदे, कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला होती सर्वाधिक गर्दी? आकडेवारी आली समोर

  मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्या दसऱ्या मेळाव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. दोन्हीही गट त्यांच्या मेळाव्याला सर्वाधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल असा दावा करीत होते. त्या प्रमाणे काल बुधवारी पारपडलेल्या ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्हीही मेळाव्यांना कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. मात्र अशातही दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यात कोणाला यश आले याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

  मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे १ लाख २५ हजारांच्या जवळपास लोकांनी हजेरी होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) मेळाव्यात सुमारे ६५ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. शिवाजी पार्कमध्ये कल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जवळपास ६५ हजार लोकांनी उपस्थिती लावली होती.

  शिवाजी पार्क :

  शिवाजी पार्क मैदानाची क्षमता सुमारे ५० हजार असून पोलिसांच्या अंदाजानुसार, बरेच लोक मैदानात होते आणि काही लोक मैदानाबाहेरही उभे होते. त्यामुळे जवळपास ६५ हजार लोकांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  बीकेसी मैदान :

  तर दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानावर पार पडला. या मेळाव्यासाठी जवळपास १ लाख २५ हजार लोक उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मैदानात सभा घेतली होती, त्यावेळी जवळपास ९७ हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. पण मोदींच्या सभेपेक्षाही शिंदेच्या मेळाव्याला जास्त गर्दी असल्याचं पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

  पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही अंदाजे दिली असून त्यामध्ये तफावत असू शकते. शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानं दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लोकांमुळे पूर्ण क्षणतेनं भरली होती.