धावत्या लोकलमधून महिलेच्या गळ्यातील चैन चोरणाऱ्या चोरट्याला ठाणे रेल्वे क्राईम ब्रांचने केली अटक

रेल्वेत चोरी आणि लूटीचे प्रमाण वाढले आहे. असाच एक प्रकार १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडला होता.

    ठाणे : धावत्या लोकलमधून महिला प्रवाशाची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. तारु शेख असे या चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात लूट आणि चोरीचे १९ गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या साहाय्याने ठाणे रेल्वे क्राईम ब्रांचने तारुला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वेत चोरी आणि लूटीचे प्रमाण वाढले आहे. असाच एक प्रकार १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडला होता. दादरहून येताना विक्रोली रेल्वे स्थानकात लोकल गाडी थांबली.

    स्थानकातून पुन्हा ही गाडी सुरु होताच एका चोरट्याने सुशिला चौधरी यांच्या गळयातील महागडी सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती देखील होते. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात ठाणे रेल्वे क्राईम पोलिसांना चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या तारु शेख या चोरटयाला अटक करण्यात आली आहे. रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अर्शद शेख यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी अशोक होळकर आणि अन्य पोलीस कर्मचारी या चोरट्याच्या शोधात होते. तारु हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात १९ गुन्हे दाखल आहेत.