‘त्र्यंबकेश्वरमधील 100 वर्षांची संदल प्रथा बंद व्हायला नको, दंगली नेमक्या कुणाला घडवायच्या आहेत?’; राज ठाकरेंचा हिंदुत्ववादी संघटनांना सवाल, गड-किल्ल्यावरील दर्ग्यांबाबत स्पष्टच म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. ते आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Visit) असून तेथील पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. ते आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Visit) असून तेथील पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ‘त्र्यंबकेश्वरमधील 100 वर्षांची संदल प्रथा बंद व्हायला नको, दंगली नेमक्या कुणाला घडवायच्या आहेत?’, असा सवालही उपस्थित केला.

  राज ठाकरे यांनी यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटाबंदीवर बोलताना म्हटलं की, त्यावेळी तज्ज्ञांना विचारून ही गोष्ट केली असती. तर आज ही वेळ आली नसती. असं काय सरकार चालतं का?, असेही त्यांनी म्हटलं. तसेच राज ठाकरे हे पक्षसंघटन बळकट करण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नाशिकमध्ये आम्ही जेवढं काम केलं, तेवढं याआधीही झालं नव्हतं आणि त्यानंतरही झालं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

  बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही

  शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही. त्याचबरोबर बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही. गावच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे.

  गड-किल्ल्यांवरील दर्गे हटवलेच पाहिजेत

  मागील वेळी लाऊडस्पीकर आणि समुद्रातील दर्ग्याच्या विषयीचा मुद्दा मांडला होता. भोंगे, माहीम दर्गा याविषयी बोलले पाहिजे, जे दिसते त्यावर बोलले पाहिजे. गड-किल्ल्यांवरील दर्गे हटवलेच पाहिजेत, असेही त्यांनी म्हटलं आहे.

  शॅडो मंत्रिमंडळाबाबत म्हणाले…

  शॅडो कॅबिनेटचं काय झालं? ती कॅबिनेट फक्त महाविकास आघाडीसाठीच होती का? असा सवाल त्यांना केला असता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘या सरकारसाठी वेगळी शॅडो कॅबिनेट, त्या सरकारसाठी वेगळी, असं काही नाही. शॅडो कॅबिनेट जाहीर केल्यानंतर महिन्याभरात लॉकडाऊन लागले. त्यामुळे दोन वर्षे काही करता आलं नाही. ती कार्यान्वित होईल’.

  त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?

  त्र्यंबक गावातून 13 मे रोजी संदल मिरवणूक निघाली होती. त्यात 25 ते 30 जण सहभागी झाले होते. वाजतगाजत आलेली मिरवणूक रात्री पावणेदहा वाजता मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ थांबली. मंदिर बंद होण्याची वेळ असल्याने भाविक प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. मिरवणुकीतील एका युवकाच्या डोक्यावरील टोपलीत फुले होती. पायरीजवळ धूप दाखविण्यासाठी त्याच्यासह काही जण पुढे गेले. त्यांना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी रोखले. या घटनाक्रमाचे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांकडून मोबाईलव्दारे चित्रीकरण करण्यात आले. याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.