रयत बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर केलेला ३ % वाढीव लाभांश सभासदांना तात्काळ मिळावा : राजेंद्र पवार

रयत बॅंकेने ८% लाभांश सभासदांना दिला असून उर्वरित ३% लाभांश तात्काळ सभासदांच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी स्वाभिमानी रयत सेवक कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केली आहे.

  सातारा : रयत बॅंकेने ८% लाभांश सभासदांना दिला असून उर्वरित ३% लाभांश तात्काळ सभासदांच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी स्वाभिमानी रयत सेवक कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केली आहे. दि. रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होऊन रयत सेवक सभासदांचे तीन पॅनल आमने सामने उतरलेले आहेत. रयत बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार असे वातावरण तयार झालेले होते. रयत कल्याण मंडळ पुरस्कृत स्वाभिमानी जय कर्मवीर पॅनेलच्या आग्रही भूमिकेमुळे संचालक मंडळाला अखेर ३% वाढीव डिव्हिडंट जाहीर करावा लागला.

  त्यामुळे सभासदांना आधीच जाहीर केलेला ८ % डिव्हिडंट सभेच्याच दिवशी वर्ग करून उर्वरित 3 % वाढीव डिव्हीडंट डी. डी. आर च्या परवानगीने सभासदांना देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका रयत सेवक कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी लावून धरली, त्यास सभागृहात उपस्थित असलेल्या रयत सभासदांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे रयत बॅंकेच्या संचालक मंडळास सर्वसाधारण सभेत नमते घेत ३%डिव्हीडंट देण्याचे जाहीर करावे लागले.

  बँकेने राखीव ठेवलेल्या फंडातून ही रक्कम देण्यात येईल असे रयत बँकेचे चेअरमन जंम्बुकुमार आडमुठे यांनी जाहीर केले. त्यामुळे रयत सेवक बँक सभासदांना एकूण ११ % डिव्हिडंट मिळणार आहे. परंतु तो तात्काळ मिळावा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. रयत बॅंकेने पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत ठेवलेल्या ११ कोटी रुपयांच्या ठेवीबाबात सभासद कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी अत्यंत परखड मत मांडले. संचालक मंडळाला याबाबत जाब विचारला. बॅंकेतील नोकरभरती, व्याजदर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव, गुगल पे,फोन पे सेवा, बॅंकेची सभासदांना विनम्र सेवा, मयत सभासदांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत अशी भूमिका स्वाभिमानी जय कर्मवीर पॅनेलने घेतली.

  सभासदांची बॅंकेकडून होणारी अडवणूक, त्यांचेही अनेक प्रश्न यावेळी मांडण्यात आले. सभासदांना दिवाळी भेट म्हणून कॅलेंडर ऐवजी सुंदर डायरी व उपयोगी साहित्य देण्याची मागणी देखील यावेळी केली. माणिकराव भोसले, कैलासराव पवार, जितेंद्र भोई, काशिनाथ सोलनकर, सचिन झगडे आदींनी सहभाग नोंदवून रयत सेवकांच्या हितांच्या प्रश्नांवर आवाज उठविला.

  शिवाजी विद्यापीठाचे माजी. प्र. कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे मा. सचिव डॉ. अशोक भोइटे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. रयत हे एक कुटुंब असून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा व डॉ.एन.डी.पाटील यांच्या विचारांचा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे असे भावनिक आवाहन डॉ. अशोक भोईटे यांनी केले.

  यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव जी.एस खोत,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अँथनी डिसुजा, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाजीराव कोरडे , रयत बँकेचे मा. चेअरमन व्ही.पी.पाटील, मा. चेअरमन देविदास गुरव, मा.चेअरमन राजाभाऊ मगदूम, मा. व्हाईस चेअरमन कुंडलिक सानप, माजी मुख्याध्यापक महादार सर,माणिकराव भोसले ,गजानन बकरे ,सुरेश वाबळे, सचिन झगडे,सुनील देवकर, जितेंद्र भोई ,अरुणकुमार पाटील, सुनील मोहिते, विजयकुमार काळदाते शंकर जाधव, दादीराम साळुंखे ,राजेंद्र कदम, राजेंद्र शेलार , सुरेखा दाते, दिपाली भोसले, जावळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.