अट्टल वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या; गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई

पुणे शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने एका अट्टल वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ३५ हजाराची दुचाकी जप्त केली आहे.

    पुणे : पुणे शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने एका अट्टल वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ३५ हजाराची दुचाकी जप्त केली आहे. तत्पुर्वी त्याच्यावर यापुर्वीचे वाहन चोरीचे तब्बल १८ गुन्हे नोंद आहेत.

    ही कारवाई अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, रवींद्र लोखंडे, गणेश ढगे, प्रदीप राठोड यांच्या पथकाने केली आहे. विकास उध्दव माने (वय ३६, रा. उमरगा जि. धाराशिव. सध्या रा. गोकुळनगर कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    विकास हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी देखील विश्रामबाग, डेक्कन, हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरातून एकूण १८ वाहने चोरल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. तत्पुर्वी शहरात वाहन चोरीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून वाहन चोरांचा माग काढला जात आहे.

    यादरम्यान, हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक रविंद्र लोखंडे व पोलीस हवालदार आजिनाथ येडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एकाकडे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल असून ही दुचाकी चोरीची आहे. सध्या तो कात्रज तलाव येथे उभा आहे. त्यानूसार, पथकाने लागलीच या परिसरात सापळा रचला. तसेच, त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासात त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. सखोल चौकशीत त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने या दुचाकी भारती विद्यापीठ तसेच डेक्कन भागातून चोरल्याचे समोर आले आहे.