संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाने विविध विसर्जन घाटांवर 17 फायरमन आणि 111 जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे.

    पुणे : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाने विविध विसर्जन घाटांवर 17 फायरमन आणि 111 जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. इतर उपाय योजनाही केल्या असून, सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्ट्या, रजा या रद्द केल्या आहेत.

    मुठा नदीकाठच्या 14 विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटस, लाईफ बॉय व रात्रीचे वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेन्ट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. नदी काठावर तसेच नदी पात्रात आडवा दोरखंड लावण्यात आलेले आहेत. पात्रातील या दोरखंडामुळे एखादी व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यास ती व्यक्ती दोरखंडास धरून जीव वाचवू शकते.

    नटराज घाटावर लाईफ मास्ट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नदीच्या पात्रामध्ये मोठा उजेड उपलब्ध करुन बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविता येणे शक्य होणार आहे. नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, काठावरच गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बरेचदा अग्निशामक दलाकडील जवान व भोई लोकांकडूनच गणपतींचे विसर्जन करण्यात येते.

    अनंत चतुर्थीचे दिवशी वृध्देश्वर घाट, संगम घाट, अमृतेश्वर घाट व नटराज सिनेमा जवळील घाट येथे भोई लोकांकडून नावेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जीवरक्षक म्हणून नियुक्त केलेल्यांकडूनही नावांची व्यवस्था केली गेली आहे.

    तीन ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा

    मिरवणुकीत काही अनूचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणुकीसंबंधीची माहिती मिळवण्यासाठी, मिरवणुकीच्या मार्गावर तीन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात आलेली आहे. विसर्जन घाटावर नागरिकांना सूचना देण्याकरीता ध्वनीक्षेपण यंत्रणा बसविली जाणार आहे.