राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद आज पूर्ण; महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठी घडामोड

  Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावरून गेल्या चार महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. अखेर निवडणूक आयोगातील सुनावणी आज संपली आहे. दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणातला सर्वात मोठा निकाल समोर येणार आहे.
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर आज सुनावणी
  केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही गटांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही गटांना लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा
  याबाबतचा निकाल कधी जाहीर करायचा, हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जातो का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला.
  दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला
  शरद पवार हे पक्षात हुकूमशाही चालवायचे, ते पक्षात मनमानी करायचे, परस्पर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायचे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. तर शरद पवार गटाच्या वकिलांनी ते आरोप फेटाळून लावले. अखेर आता दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे.
  ‘हे त्यांच्या हरण्याचं द्योतक’, शरद पवार गटाच्या वकिलांची प्रतिक्रिया
  निवडणूक आयोगाच्या आजच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ही केस आज युक्तिवाद स्तरावर संपली. निवडणूक आयोगाने हा निर्णय राखून ठेवला आहे. आमचं मत लेखी स्वरूपात द्यायला सांगितलं आहे. निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. अजित पवार गटाकडून स्पष्ट केलं आहे की संघटनेचं मत विचारात घेऊ नका. म्हणजे हे स्पष्ट होतं की त्यांच्याकडे संघटना नाही हे त्यांच्या हरण्याचं द्योतक आहे”, असा दावा वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
  2019 पासून आमच्यात वाद
  “लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेणे चुकीचं होईल. त्यांनी सांगितलं की 2019 पासून आमच्यात वाद होते. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या. हे सगळ त्यांनी पहिल्यांदा 30 जूनला सांगितलं. एकीकडे सांगता की 2019 पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
  अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय?
  सुनावणीनंतर अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण झाला. विधी मंडळातील मोठा पाठिंबा अजित पवार यांना मिळाला आहे. पुढील 5 दिवसात काही लेखी म्हणणं मांडायचं असेल तर मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलेलं विवेचन पाहता निकाल आमच्या बाजूने लागेल असं वाटतं”, असा मोठा दावा सुनील तटकरे यांनी केला.