खसाळा येथील राख तलाव फुटला, आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी गावात जाऊन केली पाहणी

पाण्याचा प्रवाह फार अधिक असल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. घातक राख नदी नाल्यांच्या पाण्यात मिसळून गावांचे पेयजल दूषित होण्याचा धोका वाढला आहे.

    नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राख साठविण्यासाठी असणारा खसाळा तलावात अचानक फुटला. यामुळे लगतच्या खसाळा, मसाळा, कवठा, खैरी येथील शेत शिवारात राखमिश्रित पाणी शिरले आहे. या घटनेमुळे शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावात जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    वीजप्रकल्पात जाळण्यात येणाऱ्या कोळशाची राख राख तलावात साठविला जातो. कोराडीतील राख खसाळा तलावात साठविली जाते. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाण्याचा कहर सुरू होता. त्यातच शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उप्पलवाडी भागातून तलावाचा बांध फुटला. पाणी उताराच्या दीशेने धावून लागले. पाण्याचा ओघ नाल्यातून व वस्त्यांकडे येताना दिसताच आरडाओरड सुरू झाली. दुपारी 1 च्या सुमारास सर्वदूर ही माहिती पोहोचली. ग्रामस्थांनी गर्दी केली. खैरी नाल्याला पूर आला आहे. नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत. पाण्याचा विसर्ग कधीपर्यंत सुरू राहिल याची कोणतीही कल्पना नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. छिंदवाडा रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह फार अधिक असल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. घातक राख नदी नाल्यांच्या पाण्यात मिसळून गावांचे पेयजल दूषित होण्याचा धोका वाढला आहे.

    आमदार बावनकुळे यांनी दिली भेट

    घटनेची माहिती मिळताच महानिर्मितीचे अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गावात जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना महाजनको कडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.