नवे दानवाड ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ; इच्छुक आत्तापासूनच मोर्चेबांधणीला प्रारंभ

नवे दानवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुक आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  सुरेश कांबळे,कुरुंदवाड :  नवे दानवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुक आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरपंच पद सर्वसाधारण गटाचे असल्याने आत्तापासूनच मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र प्रमुखापैकी एक असलेला शिवगोंडा पाटील सभापती दिपाली परीट गट मात्र तटस्थ असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र बाळासाहेब पाटील गट व कै हरीश कांबळे संजय धनगर, रावसाहेब कुंभोजे गट आत्तापासूनच मोर्च बांधणी करत असून बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

  नवे दानवाड सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी असून थेट जनतेतून निवड होणार आहे एकूण मतदार २९०० आसपास आहे. पैकी १६०० इतके मागासवर्गीय व मुस्लिम मतदारांची संख्या आहे. ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर सध्या कै हरीश कांबळे संजय धनगर व रावसाहेब कुंभोजे गट व बाळासाहेब पाटील गटाची सत्ता असून श्रीमती वंदना कांबळे या सरपंच पदावर कार्यरत होत्या. त्यांनी लाखो रुपयांची विकास कामे करून गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.

  -संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू
  शिवगोंडा पाटील ३ गटाचे बाळासाहेब गटाचे ४ व कै हरीश कांबळे संजय धनगर गटाचे ४ असे एकूण ११ सदस्य कार्यरत होते. कै हरीश कांबळे व बाळासाहेब पाटील गटांनी युती करून ग्रामपंचायतवर सत्ता आणली होती.मात्र उपसरपंच पदावरून विद्यमान गटातच मतभेद निर्माण झाल्याने सहजरीत्या शिवगोंडा पाटील गटाला उपसरपंच पद मिळाले होते. ८ डिसेंबर रोजी मतदान होत असून आत्तापासूनच सत्ताधारी कै हरीश कांबळे संजय धनगर गट व बाळासाहेब पाटील गट यांनी स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली असून ठीक ठिकाणी बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे.

  शिवाय संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे सत्तेपासून बाजूस असलेल्या शिवगोंडा पाटील गटानेही पंचायत समिती सभापती दिपाली संजय परीट यांच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने मोठा भरीव निधी आणून नवे दानवाड सह परिसरातील गावांचा कायापालट केला आहे, असे असले तरी सध्या ग्रामपंचायत निवडणुकी करिता या गटाची तटस्थ भूमिका दिसून येत आहे.

  -विजयासाठी स्वाभिमानीची साथ महत्त्वाची
  सध्या ग्रामपंचायतच्या सत्तेपासून अलिप्त असलेला शिवगोंडा पाटील, दिपाली परीट सभापती गटाने काहींशी तटस्थ भूमिका घेतल्याने इच्छुकांच्यात मोठी घालमेल सुरू झाली आहे. नेमक्या कोणत्या वेळी हा गट तटस्थता संपवून सक्रिय होऊन आपली हुकमाची पत्ते कधी खोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका अद्याप जाहीर केली नसली तरी विजयासाठी स्वाभिमानीची साथ महत्त्वाची आहे. एकंदरीत शिवगोंडा पाटील, सभापती दिपाली परीट गटाने तटस्थता संपवून स्थानिक राजकारणात सक्रिय झाल्यानंतरच चुरस आणखी वाढणार आहे.