दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईलाच संपवलं; येरवड्यातील घटना

दारूसाठी पैसे न देणाऱ्या वृद्ध आईचा ३० वर्षीय मुलाने आणि नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे : दारूसाठी पैसे न देणाऱ्या वृद्ध आईचा ३० वर्षीय मुलाने आणि नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध आईचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.
    मंगल मोहन नेटके (वय ६०, रा. कामराजनगर, येरवडा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मयुर मोहन नेटके व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांच्याविरोधात बहिणीच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
    पोलिसांच्या माहितीनुसार, मंगल नेटके या कामराजनगरमध्ये मुलासोबत राहण्यास होत्या. त्या घरघुती कामे करत होत्या. तसेच, एका कार्यालयात देखील साफ सफाईचे काम करत होत्या. त्या कार्यालयाकडून त्यांचा पगार झाला होता. त्याचे पैसे त्यांच्याकडे होते. ही बाब मुलगा मयुर याला समजली. दरम्यान, मुलगा मयुर याला दारूचे व्यसन आहे. तर, अल्पवनयीन मुलगा नातेवाईक आहे. मयुर भंगार गोळा करून ते विक्री करत आणि त्यातून आलेल्या पैशांमधून दारू पित असत.
    तत्पुर्वी मुलाला पगार झाल्याचे समजल्यानंतर त्याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मयुरच्या डोक्यात होता. त्याने नातेवाईक मुलासोबत आईला बेदम मारहाण केली. यात त्या गंभीर झाल्या. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.