RSS चा काळा इतिहास पुसला जाणार नाही, कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी.. प्रकाश आंबेडकरांची भाजपवर सडकून टीका

    पुणे : ‘पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला आनंदोत्सव साजरा करणाऱ्या आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून पाळणाऱ्या आरएसएस-भाजपने आता कितीही जूना इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवू शकणार नाहीत.त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि प्रतीक, आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारले आणि त्याऐवजी विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली, जी ते आजही करत आहेत. हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही. संघाचा हा काळा इतिहास कधीच पुसला जाणार नाही.’ अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

    पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, ‘पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला आनंदोत्सव साजरा करणाऱ्या आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून पाळणाऱ्या आरएसएस-भाजपने आता कितीही जूना इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवू शकणार नाहीत. नागपूरच्या बर्डी पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झालेली आहे असे अॅड. आंबेडकर यांनी म्हटले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे संघाने लेखी माफीनामा दिलेला आहे. धर्माच्या नावाखाली समाजाला दुभंगण्याचे काम यांनी केले आहे आणि आताही करीत आहेत. सामान्य जनतेने यांना बळी पडू नये असे आवाहन आम्ही करीत आहोत, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

    ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘हेगडेवार, गोळवलकर, सावरकर आणि गोडसे यांचे हे लोक आता स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारताच्या प्रतिकांचा वापर करत आहेत, ज्यांना त्यांनी नाकारले होते आणि आजही ते नाकारत आहेत. गोळवळकरांच्या We or Our Nationhood Defined या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाची आरएसएस-भाजपने जाहीर होळी करावी तरच आम्ही मान्य करू की ते बदलले आहेत,’ असेही आव्हान संघ भाजपला दिले.