तोरस्करवाडी धबधब्यात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी बाहेर काढला : जीवरक्षक दिनकर कांबळे व गारगोटीतील नागरिकांना यश

तोरस्करवाडी येथील धबधब्यात बुडालेल्या गारगोटीतील तरुणाचा मृतदेह काढण्यात तब्बल तीन दिवसांनी यश आले. जीवरक्षक दिनकर कांबळे व नाना सावंत यानी पाण्यात बुडून मृतदेह बाहेर काढला.गारगोटीतील चार युवक रविवारी सकाळी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते.

    गारगोटी : तोरस्करवाडी येथील धबधब्यात बुडालेल्या गारगोटीतील तरुणाचा मृतदेह काढण्यात तब्बल तीन दिवसांनी यश आले. जीवरक्षक दिनकर कांबळे व नाना सावंत यानी पाण्यात बुडून मृतदेह बाहेर काढला.गारगोटीतील चार युवक रविवारी सकाळी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सर्वजण धबधब्यातील पाण्याचा आनंद लुटत असताना प्रणव भिकाजी कलकुटकी हा अचानक गायब झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी दीड किलो मिटर चालत येऊन तोरस्करवाडी येथील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. रविवारी अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती.

    सोमवारी दिवसभर आपत्ती कालीन व्यवस्थापन पथक, व्हाईट आर्मी, स्थानिक व गारगोटीतील नागरीकांची शोध घेतला होता तरी देखील मृतदेह सापडला नव्हता.आज सकाळी जीवरक्षक दिनकर कांबळे, नाना सावंत यांनी ऑक्सिजन सिलेंडरच्या साह्याने पुन्हा धबधब्यातील पाण्यात उतरून शोध घेतला. यावेळी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना तब्बल ५० फुट खोलीवर मृतदेह दगड व लाकडात अडकला असल्याचे निदर्शनास आले. जीवरक्षक दिनकर कांबळे, नाना सावंत, गारगोटीचे माजी उपसरपंच अरूण शिंदे, अमोल कलकुटकी, प्रशांत भोई, विजय सारंग, सोन्या वडर यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.