जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले

नागरी क्षेत्र वगळून जिल्ह्यात आचारसंहिता, १८ डिसेंबरला मतदार तर २० डिसेंबरला मतमोजणी

  सांगली : जिल्ह्यातील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी होईल. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नागरी क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंच पदासाठी निवडणूक चुरशीने होईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने गावांतील राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट झाले.

  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून आठ महिने झाले तरी अद्याप निवडणूक झालेली नाही. निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर आणि नोेव्हेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या निवडणुका वेळेत घेण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे महिन्याभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ऑक्टोंबर व नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम २१ ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. ऑक्टोंबर व नोव्हेंबरअखेर मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  तहसिलदारांनी निवडणुकीची दि. १८ नोव्हेंबर रोजी नोटीस प्रसिध्द करतील. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. २८ नोव्हेंबर (सोमवार) ते दि. २ डिसेंबर (शुक्रवार) सकाळी ११ ते दुपारी ३. अर्जांची छाननी दि. ५ डिसेंबर (सोमवार) सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत दि. ७ डिसेंबर (बुधवार) दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द त्याचदिवशी प्रसिद्ध होईल. आवश्यक असल्यास मतदानाचा दि. १८ डिसेंबर (रविवार) सकाळी ७:३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:३० तर मतमोजणी दि. २० डिसेंबर (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. २३ डिसेंबर राहिल.
  निवडणूक लागलेल्या गावांमध्ये बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यामध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुध्दा आचारसंहिता लागू राहील. आचारसंहिता ही केवळ ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असेल. महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू नाही. ग्रामपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू आहे. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषणा आचारसंहिता कालावधीत केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दिला आहे.
  ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ४५२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने निवडणूक होत आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक ८८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होईल. त्यापाठोपाठ जत तालुका ८१, मिरज ३८, आटपाडी २६, कडेगाव ४३, कवठेमहांकाळ २९, खानापूर ४५, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंच पदासाठी निवडणूक होईल. त्यामुळे सरपंचासाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम राहिल. त्यामुळे गावागावातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

  ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
  उमेदवारी अर्ज दाखल करणे – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
  अर्जांची छाननी – ५ डिसेंबर
  अर्ज माघारीची मुदत व चिन्ह वाटप – ७ डिसेंबर
  मतदान – १८ डिसेंबर
  मतमोजणी – २० डिसेंबर