15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

शिवसेनेतील सत्ता संघर्ष आणि फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी लांबणीवर गेली असून आता ती 12 ऑगस्टला होणार आहे.

    मुबंई : राज्यात नवं सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहेत तरीही अद्याप मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त काही सापडला नाही आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. जो तो मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत विचारणा करताना दिसत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना विचारवले असता १५ ऑगस्टच्या आधी होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.

    मंत्रीमंडळ विस्ताराला मुहुर्त सापडेना

    राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 36 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरला नाही. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारीही केली. मात्र तरीही विस्तार लांबणीवर पडला आहे. यावरून विरोधी पक्षाने टिका करायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरत आहात असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विचारला आहे त्याचं कारणही तसेच आहे कारण सरकार येऊन 36 दिवस झाले तरीही नव्या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्यानंतरच विस्तार होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

    15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यासंदर्भातील प्रश्न फडणवीसांना विचारला गेला होता. शिवसेनेतील सत्ता संघर्ष आणि फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अपेक्षित असलेली सुनावणी लांबणीवर गेली असून आता ती 12 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारही लांबणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.