
पुणे : लोहगाव परिसरात वाहनांची तोडफोड करीत राडा घालून पसार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनादेखील पोलिसांनी पकडले आहे. त्यांनी परिसरातील २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.
विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी हाशीम खलील शेख (वय १८, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इनायत अली शौकत अली अन्सारी (रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, राकेश चांदेकर, सचिन जाधव, शैलेश नाईक यांनी केली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोहगाव परिसरातील कलवडवस्ती भागात मध्यरात्री हातात कोयते व हत्यार घेऊन आलेल्या टोळक्याने अचानक रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. तर, लाथा घालून गाड्याही पाडल्या होत्या. मध्यरात्री हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. लागलीच विमानतळ पोलिसांनी येथे धाव दिली होती. परंतु, आरोपी पसार झाले होते. यादरम्यान, गुन्हा नोंदकरून आरोपींचा शोध सुरू केला होता.
हाशीम शेख याला अटक
यादरम्यान, पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना आरोपी हे येथील मोकळ्या मैदानात झाडांमध्ये लपून बसल्याचे समजले. लागलीच पथकाने त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. तेव्हा हाशीम शेख याला अटक केली. तर, दोन अल्पवयीन मुलांना पकडले. पोलिसांनी धातक शस्त्र व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.