ऑनलाईन फसवणुकीचा आलेख वाढलाय; आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्याच…

आजच्या तांत्रिक युगात विविध अमिषाला बळी पडून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक गुन्ह्याचा आलेख वाढतीवर आहे.

    गडचिरोली : आजच्या तांत्रिक युगात विविध अमिषाला बळी पडून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक गुन्ह्याचा आलेख वाढतीवर आहे. त्यामुळे ऑनलाइन विविध वस्तू खरेदीसह आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याची नितांत गरज आहे.

    मागील काही वर्षात मोबाइल, कपडे, गृहपयागी वस्तू आदींसह विविध वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचे फॅड आहे. याचा फायदा घेत अनेक कंपन्या ऑनलाइन व्यवसायात उतरल्या आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून एकावर एक मोफत तसेच कमी दरात वस्तू विक्रीस उपलब्ध असल्याचे भासवून ग्राहकांना कंपन्या जाळ्यात ओढत आहेत. यातूनच अनेकांची फसगत असून शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक तक्रार प्राप्त होत आहेत.

    ऑनलाइन वस्तू खरेदी करतांना पेटीएम, गुगल पे, फोन पे तसेच युपीआयद्वारे आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे अनेक कंपन्या संबंधित फोन व मॅसेज करुन आपल्या खात्याची माहिती घेतात. प्रक्रिया पूर्ण होताच अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

    यातील काहींद्वारे पोलिसात तक्रार केली जात असली तरी अनेकजण तक्रार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाइन वस्तुंची खरेदी करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.