चिखल डोंगरी गावात चालतो जात पंचायतीचा कायदा, नियम मोडणा – या ६ ग्रामस्थांना टाकले वाळीत, पोलीसांते दुर्लक्ष

    वसई : चंद्रयानाच्या काळात तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणा-या विरारमधील एका गावात अजूनही जात पंचायतीचा कायदाच चालत असून, नियम मोडणा-या ६ ग्रामस्थांना २५ हजारांचा दंड ठोठावून त्यांना वाळीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे तक्रार येवूनही या गंभीर प्रकाराकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

    सर्व बाबींनी प्रगत अशा विरारच्या चिखलडोंगरी गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या गावात मांगेला समाजाचे प्राबल्य आहे. आणि या समाजाची जात पंचायतही अस्तित्वात आहे. गावातील स्वयंघोषित पुढारी जातपंचायत चालवत असून, त्यांनी बनवलेले नियम आणि कायदा मोडणा – यांना चक्क वाळीत टाकले जात आहे. त्यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जात आहे. ही धक्कादायक बाब आता उघड झाली आहे. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळाबरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र गावातील दिपा वैती सेवा करण्यासाठी सासणे गुरूपीठात गेल्या होत्या, ही बाब जातपंचायतीला समजल्यावर त्यांना वाळीत टाकून २५ हजारांचा वसुल करण्यात. तिच्याशी संबंध ठेवण्यास कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही मनाई करण्यात आली होती.

    दिपा वैतीची तब्येत बिघडल्याने तिचे मोठे भाऊ उमेश वैती सासणे येथे तिला भेटायला गेले होते. ही बाब समजल्या वैती यांनाही जात पंचायतीने दंड ठोठावून वाळीत टाकले आहे. त्यांनी दंड न भरल्याने गावातील मंदिरात जायला बंदी घालून नळ कनेक्शनही बंद करण्यात आले आहे. त्यांची रिक्षाही जातपंचायतीने काढून घेतली आहे. आता पर्यंत वैती यांनी १ लाखाहून अधिक दंड भरला असतानाही आणखी १ लाखांचा दंड भरण्याची त्यांना पंचायतीने दमदाटी केल्यामुळे ते गावाबाहेर रहात आहेत. काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीला सासणे येथे गेलेल्या दर्शन मेहेर, रुचिता मेहेर आणि कवेश राऊत यांनाही २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जात पंचायतीच्या या दहशत आणि गुंडगिरी विरोधात उमेश वैती आणि अन्य ५ ग्रामस्थांनी ३२ जणांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, या गंभीर तक्रारीकडे पोलीसांनी दुर्लक्ष केले आहे. जात पंचायतीने मात्र, या आरोपाचे खंडण केले आहे, गावाचा हा अंतर्गत कारभार असून त्यात कुणा एकाचा निर्णय नसतो, असा कुठलाच प्रकार होत नाही असे पंचायतीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराची अंध श्रध्दा निर्मूलन समितीने मात्र गंभीर दखल गेतली असून, पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्ता दाभोळकर यांनी केली आहे.