धोकादायक खदाणी बुजवा आणि ग्रामीण भागात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार : रामदास आठवले

डोंबिवलीजवळच असलेल्या देसलेपाडा भोपर गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्या शोकाकुल परिवाराची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.

  मुंबई : डोंबिवलीजवळच असलेल्या देसलेपाडा भोपर गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्या शोकाकुल परिवाराची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.

  यावेळी ठाणे जिल्हाधिकऱ्यांशी आणि कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून धोकादायक खदाणी त्वरित बुजवून टाकाव्यात आणि पाण्याची समस्या त्वरित सोडविण्याबाबत रामदास आठवले यांनी चर्चा केली. यावेळी डोंबिवली ग्रामीण भागात देसलेपाडा येथें पाण्याची टाकी बांधून सर्वांना नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत चे काम लवकर होईल अशी माहिती कडो मनपा आयुक्तांनी रामदास आठवले यांना दिली.

  डोंबिवली प्रमाणे राज्यभरात खोदकाम करून होणारे खड्डे; डबके; धोकादायक खदाणी त्वरित बुजवाव्यात किंवा त्यांना संरक्षण जाळी बसवावी तसेच अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही.अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. त्यामुळे पाण्यासाठी लू जीव धोक्यात घालून खदाणी कडे लोक जातात ते थांबविण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जनतेच्या या मागणी कडे त्यांचे लक्ष वेधणार आहोत असे रामदास आठवले म्हणाले.

  डोंबिवली येथे शोकाकुल गायकवाड परिवाराला भेट देण्यास आले असता येथील खदाणी मध्ये झालेल्या दुर्घटनेचा पंचनामा सुद्धा राज्य शासनाने केला नसून कोणतीही सांत्वनपर मदत देखील या शोकाकुल कुटुंबाला दिली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यावेळी धोकादायक खदाणी बंद करण्यासाठी आणि पाणी समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

  यावेळी कल्याण डोंबिवली येथील महार वतनी जमीनी बेकायदेशीर विकल्या जात आहेत. महार वतनी जमीन विकणे कायद्याने चुकीचे आहे मात्र चुकीचे मार्ग वापरून येथील महार वतनी जमीनी काही बिल्डर बळकावत आहेत त्याबाबत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी स्थानिकांनी रामदास आठवले यांच्या कडे केली.

  भोपर येथील खदाणी मध्ये पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. डोंबिवली आसपासच्या देसलेपाडा, भोपर आदी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. यात अपेक्षा गायकवाड (वय ३०), मीरा गायकवाड (वय ५५), मयुरेश गायकवाड (वय १५), मोक्ष गायकवाड (वय १३) आणि निलेश गायकवाड (वय १५) यांचा यात मृत्यू झाला. हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. त्यांच्या निवासस्थानी जाऊन रामदास आठवले यांनी गायकवाड परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव; डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.