राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेंना अटक; शिक्षण विभागात लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

Shailaja Darade Arrested : राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर शिक्षण विभागात लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीत त्या दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होते. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना काही वेळापूर्वी अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  पुणे : पुण्यातून शैलजा दराडे यांना अटक केल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण विभागात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

  हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती.

  ज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष

  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त असताना दराडे यांनी राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसेही घेतले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावता फसवणूक केली. शिक्षण विभागातच आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते.

  प्रभारी आयुक्त शैलजा दराडेंचे निलंबन

  या फसवणुकीची गंभीर दखल घेत तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त शैलजा दराडेंचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर शिक्षण विभागात नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दराडेंचे निलंबन करण्यात आले होते. आता याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

  44 उमेदवारांची फसवणूक

  दरम्यान, शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने ४४ जणांची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्तांना अटक करण्यात आली आहे.

  फिर्यादी यांनी दिली माहिती

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत होते. जून २०१९ मध्ये त्यांची दादासाहेब दराडे याच्याशी ओळख झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सूर्यवंशी यांना सांगितले.

  सूर्यवंशी यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले

  मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षकपदावर नोकरी लावतो, असे आमिष त्याने फिर्यादी यांना दाखवले. त्या बदल्यात त्याने सूर्यवंशी यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यवंशी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

  गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

  शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी शैलजा दराडे या त्यांच्या भावामार्फत डी.एड. झालेल्यांकडून सुमारे १२ तर बी.एड. झालेल्यांकडून सुमारे १४ लाख रुपये घेत होत्या. या प्रकरणी त्यांना गेल्या महिन्यात निलंबन करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता.