महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल केल्याने दाम्पत्यावर गुन्हा दाखल

एकमेकांचे अर्धनग्न फोटो तसेच सोबतचे फोटो एकमेकांना शेअर केले. त्या वेळेस प्रकाश याने चॅटिंग दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट काढून ठेवले. त्यानंतर पीडित महिलेचा पती व ती प्रकाश यांच्याकडील काम सोडून दुसरीकडे गेले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एका महिलेसोबतचे अश्लील फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना व्हायरल केल्याने पती-पत्नीवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिलेचा पती व ती कुमावत (वय ३० रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्याकडे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करण्यास होते. त्यावेळेस त्याची पत्नी पीडित महिला हिचे प्रकाश कुमावत सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकाशी चॅटींग करु लागले.

    एकमेकांचे अर्धनग्न फोटो तसेच सोबतचे फोटो एकमेकांना शेअर केले. त्या वेळेस प्रकाश याने चॅटिंग दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट काढून ठेवले. त्यानंतर पीडित महिलेचा पती व ती प्रकाश यांच्याकडील काम सोडून दुसरीकडे गेले. त्यावेळेस प्रकाश व त्याची पत्नी पायल या दोघांनी पीडित महिला व तिच्या पती यांना परत कामाला येण्यास सांगितले. त्यावेळी पीडितेच्या पतीने व पीडितेने कामावर येण्यास नकार दिला. त्यावेळी त्या दोघांनी सदर महिलेचे प्रकाश सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

    पीडित महिला व तिच्या पती यांच्या नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून सदरचे फोटो पाठवले. पोलिसांनी खात्री करून दोघा पती-पत्नीवर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट २००० कलम ६७ व भादवि कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला.

    सोशल मीडियावर अश्‍लील फोटोग्राफ प्रकाशित करणे, फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अश्लील फोटो मेसेज व्हायरल करू नयेत, तसे केल्यास तक्रारी प्राप्त झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.