जेवणासाठी बनवलेलं मटण कुत्र्याने खाल्याने वडिलांचा राग अनावर, मुलीला मारली गोळी

जेवणासाठी बनवलेलं मटण कुत्र्याने खाल्याने संतापलेल्या वडिलाने आपल्या मुलीचीच हत्या केली घटना उस्मानाबाद येथे घडली आहे.

    उस्मानाबाद : रविवारी चिकन मटणाचा बेत बऱ्याच जणांच्या घरात करण्यात येतो. मात्र या मटणावरून झालेल्या वादात कुणाचा जीव जाईल याची कल्पनाही कुणी करु शकत नाही. पण हे घडलयं तुळजापुर येथील एका मुलीसोबत. जेवणासाठी केलेल्या मटणावर कुत्र्यानेच ताव मारल्याने झालेल्या वादात वडिलाने आपल्या पोटच्या मुलीवर गोळी झाडत तिची हत्या केली. काजल शिंदे (वय, 27) असं मृत मुलीचं नाव आहे.

     

    तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे येथील मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह राहत होती. रविवारी जेवणासाठी घरात मटण बनवण्याचा बेत आखण्यात आला. त्यानुसार तिने कुटुंबियांसाठी स्वयंपाक केला आणि ती इतर काम करण्याक व्यस्त झाली. इतक्यात कुत्र्याने जेवणासाठी तयार केलेले हे मटण खाल्ले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काजलचा आई-वडिलांसोबत वाद झाला. या दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या वडीलांनी गावठी बंदुकीतून काजलवर गोळी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी काजलच्या पतिच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात वडील गणेश भोसलेविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून आई मीरा भोसलेला अटक करण्यात आली आहे.