
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात सामान्यांचे प्रश्न मांडले जात असतात, मात्र या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. हिवाळी अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. यावरुन विरोधक व सत्ताधारी यांच्यात दररोज खडाजंगी सुरु आहे. यावर एसआयटी चौकशीचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर विरोधकांनी ‘ईएस’ची एसआयटी चौकशी व्हावी असं म्हटलंय. त्यामुळं ‘ईएस’ या नव्या प्रकरणाची आता भर पडली असून, यावरुन सोमवारी वादळी ठरण्याची शक्यता आहे.
काय आहे ‘ईएस’ प्रकरण?
दरम्यान, ‘एयू’ प्रकरण अधिवेशनात गाजत असताना, आता ‘ईएस’ यावर उद्या विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि या नैराश्यातून मी आत्महत्या करत आहे, अशी नोंद सूरज परमार यांच्या डायरीत सापडली आहे. तसेच ‘ईएस’ असा उल्लेख आढळल्यामुळं या चार नगरसेवकांसह ठाण्यातील शिवसेनेचे तत्कालीन नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे सुशंयाची सुई सरकते आहे, ‘ईएस’ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात आहेत, त्यामुळं या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
सीमावाद ठराव मांडण्यासाठी विरोधक आक्रमक
दुसरीकडे शुक्रवारी मविआच्या आमदारांनी सभागृहात न जाता कामकाजावर बहिष्कार घालत, प्रतिसभागृह विधानभवनाच्या प्रागंणात उभे केले आहे. तसेच कर्नाटक सरकारने ठराव मांडल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार देखील कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मांडण्याची शक्यता आहे. यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सोमवारी सरकारला ठराव मांडण्यास भाग पाडू असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं सीमावाद ठरवावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, अधिवेशनातील दुसरा आठवडा म्हणजे सोमवार देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.