ताडोबातील सर्वात मोठ्या ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हीडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. वन विभागाने हा व्हीडीओ बघितल्यावर त्याच्या हलचालींकडे लक्ष केंद्रित केले होते.

    चंद्रपूर: वाघडोह नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ चांगलाच धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर त्याला ईतर वाघांनी वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. मामला, जुनोना, लोहारा, मसाळा अशा जवळपासच्या जंगलात गेली पाच वर्षे तो वावरला. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते.

    शिकारीच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या गुरे आणि माणसांवर तो अलीकडे हल्ले करू लागला होता. वय वाढल्याने त्याला शिकारीला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे तो गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करुन जगायचा. 21 मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता, तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हीडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. वन विभागाने हा व्हीडीओ बघितल्यावर त्याच्या हलचालींकडे लक्ष केंद्रित केले होते.