सीनाळा जंगलातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा मृत्यू, वन्यजीवप्रेमी व्यथित

त्या सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

    चंद्रपूर : जिल्ह्यातील सीनाळा जंगलातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तो 17 वर्षे वयाचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघडोह नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता.

    त्याचे वय ते वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता. 21 मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता, तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हीडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सीनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.