अल्पवयीन मुलाच्या पालकत्त्वाची जबाबदारी मामाकडे! .. आजीकडे सोपावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द

मुलगा आईच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार

    मुंबई : आपल्या वडिलांनी आईची हत्या केल्याचा साक्षीदार असलेल्या साडेतीन वर्षीय मुलाचे पालकत्त्व उच्च न्यायालयाने त्याच्या मामाकडे सोपवले. त्याचवेळी मुलाच्या आजीकडे (वडिलांच्या आईकडे) त्याचे पालकत्त्व देण्याचा शहर दिवाणी न्यायालयाचा आदेशही न्यायालयाने रद्द केला.

    वडिलांनी आपल्या आईची हत्या केल्याचा अल्पवयीन मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून या घटनेचा त्याच्या मनावर नक्कीच खोलवर परिणाम झाला असेल. इतक्या लहान वयात एवढा मोठा आघात झालेला असताना वडिलांच्या आईकडे म्हणजे आजीलाच त्याचे पालकत्त्व देण्यात आले. ज्या घरात त्याच्या आईची हत्या झाली त्याच घरात मुलाला राहू देणे अशक्य आहे. असे न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फेटाळताना आपल्या आदेशात स्पष्ट केले.

    काय आहे प्रकरण

    दंतचिकित्सक असलेल्या पतीला पत्नीच्या चरित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येऊन संबंध ताणले गेले होते. पतीला आपणच मुलाचे पालक असण्यावरही संशय होता. त्यातूनच त्याने पत्नीला डीएनए चाचणी करण्यास भाग पाडले. त्यातच ११ डिसेंबर २०१६ मध्ये त्याने पत्नीची मुलासमोरच हत्या केली. तेव्हा, मुलगा अवघ्या साडेतीन वर्षांचा होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मुलाच्या साक्षीवरून वडिलांना कारगृहात जावे लागले असून हत्येच्या कलमांतर्गत खटला सुरू आहे. आता मुलगा ११ वर्षांचा झाला आहे. या मुलाच्या पालकत्त्वासंबंधित याचिकेवर साल २०१८ रोजी दिवाणी न्यायालयाने निर्णय देताना त्याचे पालकत्त्व वडिलांच्या आईकडे (आजी) सोपवले. त्या निर्णयाला मुलाच्या मामाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

    उच्च न्यायालयाचे निरीक्षण

    लहान वयातच मुलाला मोठा मानसिक आघात झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने अल्पवयीन मुलाला सर्व पक्षांसमोर बोलावून कोणासोबत राहणार आहेस याबाबत विचारणा केली. ही वस्तुस्थिती चकित करणारी आहे. मुलाने सर्वांसमोर आजीकडे बोट दाखवले, याचा अर्थ असा नाही की त्याला आजीसोबत राहायचे आहे. अखेर या संदर्भात मुलाची चौकशी कशी होणार?, कनिष्ठ न्यायालयाने खेळीमेळीच्या वातावरणात खासगीत मुलाशी चर्चा करून निर्णय देणे आवश्यक होते, असे निरीक्षण न्या. पी. के. चव्हाण यांनी सर्व वस्तुस्थिती विचारात घेतल्यानंतर नोंदवले. तसेच मुलगा आईच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अशा परिस्थितीत जर त्याचे वडील खटल्यातून निर्दोष सुटले तर भविष्यात मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रतिवादी मुलाची आजी या ७१ वर्षांच्या वृद्ध असून एकट्या राहत आहेत. ज्या कदाचित मुलाची भविष्यातील काळजी घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाहीत. दुसरीकडे, आईच्या मृत्यूपासून मुलाचे मामा त्याचे संगोपन करत आहेत. त्याची योग्य काळजी घेण्यासाठी शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्याही ते योग्यच आहेत, असेही स्पष्ट करून न्यायालयाने मुलाच्या पालकत्त्वाची जबाबदारी मामाकडे सोपवून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.