shirdi-sai-baba-mandir

- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांचा निर्णय

    अहमदनगर – साई मंदिर आणि परिसरात सीआयएसफची सुरक्षाव्यवस्था नियुक्तीच्या विरोधात शिर्डीकर ग्रामस्थांनी 1 मे पासून बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला. साई मंदिरातल्या प्रस्तावित सुरक्षाव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन शिर्डीमध्ये चांगलेच वातावरण तापलं आहे.

    करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचं अनेकदा समोर आले होते. त्यानंतर मंदिराला दुहेरी सुरक्षा पुरविण्यात आली होती. दरम्यान, साई मंदिरात प्रस्तावित CISF सुरक्षेला ग्रामस्थांनी विरोध  केला होता. याविरोधात ग्रामस्थांनी 1 मे पासून बेमुदत बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला. यावेळी विखे पाटील म्हणाले की, ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचवणार आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली आहे.

    काय आहे प्रकरण?
    साईबाबा मंदीरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थानच्या सुरक्षा विभागा बरोबर स्थानिक महाराष्ट्र पोलीस पाहतात. साईबाबा मंदिराला दहशतवाद्यांचा धोका असल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती.  त्यानंतर हायकोर्टानं सीआयएसएफच्या सुरक्षाव्यवस्था नेमणुकीचा विचार केला. त्यावर साई संस्थानकडून कोर्टामध्ये सकारात्मक अहवाल देण्यात आल्याचं समजताच शिर्डीचे ग्रामस्थ संतप्त झाले. साई मंदिर आणि परिसरात सीआयएसफची सुरक्षाव्यवस्था नियुक्त करण्यास शिर्डीकर ग्रामस्थांचा विरोध होता. सध्या आहे ती सुरक्षाव्यवस्था कायम राहावी असा शिर्डी ग्रामस्थांची मागणी आहे.

    शिर्डीकर ग्रामस्थांच्या या आहेत मागण्या..
    1. साईबाबा मंदीराला सीआयएसफची सुरक्षा व्यवस्था नको.
    2. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद आएएस अधिकार्यांडे न देता, हे पद उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्याकडे असावे.
    3. शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे.