पन्हाळा भूमि उपअधिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

पन्हाळा नगरपरिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी ताबा दिलेल्या जागेची भूमि उपअधिक्षकांनी बेकायदेशीर मोजणी करुन नावावर नसलेल्या जागेचा ताबा दुसऱ्याकडे देण्याचा प्रयत्नाला नगरपरिषद व तहसीलदार यांनी हरकत घेतली.

    पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी ताबा दिलेल्या जागेची भूमि उपअधिक्षकांनी बेकायदेशीर मोजणी करुन नावावर नसलेल्या जागेचा ताबा दुसऱ्याकडे देण्याचा प्रयत्नाला नगरपरिषद व तहसीलदार यांनी हरकत घेतली. त्यामुळे होत असलेली मोजणी थांबल्याने तीन कोटी किंमतची जागा सुरक्षित राहिली असली तरीसुद्धा भूमि उपअधिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्या इतके धाडस कशातून आले याची चौकशी होणे गरजेचे आहे.

    पन्हाळा शहरातील शिवतीर्थ तलावाच्या जवळील जागा सि.स.नंबर ६३६ यातील जागा पर्यटन विकास महामंडळ, पंचायत समिती व नगरपरिषदेकडे जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरित केली आहे. तर सि.स.नंबर ६३५ ही लिजवर दिलेली 28 गुंठे जागा १९५४ साली कमलाकर दत्ताजीराव धनवडे यांनी घेतली. त्यांनी मिळालेली जागा धैर्यशील मोहीते यांना विकली. मोहीते यांनी तारामती सुरेश शिरगावकर यांना विकली. या सर्वांची महसूल सातबारावर नोंद झाली. पण ७२४ नंबरच्या डायरीवर धनवडे यांचे नाव तसेच राहिले. याचा आधार घेऊन धनवडे यांचे वारस शिवराज कमलाकर धनवडे यांनी सातबारा पत्रकी नाव नोंद करण्याऐवजी सिटीसर्व्हे मालमत्ता पत्रकी नाव नोंद केले व मोजणी करून जागेचा ताबा मागितला.

    जागेची मोजणी करण्यासाठी सिटीसर्व्हे विभागाने जागेचा जुना सर्व्हे नंबर ८/अ/१ याचा वापर केला खरतर या सर्व्हे नंबर मध्ये ७५०६२ चौ.मि. इतकी जागा नोंद आहे. या सर्व जागेची जिल्हाधिकारी यांनी रितसर आदेशानुसार वेगवेगळया विभागाला जागा दिली आहे.