शहराचा विकास झपाट्याने सुरू; ९ कोटींची विकासकामे होणार

शिरोळ नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास झपाट्याने सुरू असून, येत्या काही दिवसात ९ कोटी रुपयाची विकासकामे सुरू होणार आहेत. तर सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात १ कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

  शिरोळ : शिरोळ नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास झपाट्याने सुरू असून, येत्या काही दिवसात ९ कोटी रुपयाची विकासकामे सुरू होणार आहेत. तर सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात १ कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

  शिरोळ शहरातील नागरिकांना २४ तास मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता २५ कोटी रुपयाची नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याकरिता शासनाकडे २५ लाखाची अनामत रक्कम वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी दिली आहे.

  शिरोळच्या विकासाला भरघोस निधी

  शिरोळ येथील प्रभाग क्रमांक ४ मधील क्रांती चौकातील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नगरपालिकेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील बोलत होते.

  ते पुढे म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळच्या विकासाला भरघोस निधी येत आहे.

  सर्वांच्या सहकार्याने शिरोळचा विकास करू

  कलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. शहरात सध्या ३ कोटी रुपयांच्या विकास कामांची वर्क ऑर्डर निघाली आहे ती कामे सुरू झाली आहेत आणि ५ कोटी रुपयांची विकास कामे लवकरच सुरू होतील. तसेच ९ कोटी रुपयाची विकास काम प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगून सर्वांच्या सहकार्याने शिरोळचा विकास करू, असे आश्वासन दिले.

  पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

  यावेळी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील नगरसेवक एन वाय जाधव, पै. प्रकाश गावडे, राजेंद्र माने, योगेश पुजारी, राजाराम कोळी, नगरसेविका सुनीता आरगे, सामाजिक कार्यकर्त्या अन्नपूर्णा कोळी, सामाजिक कार्यकर्ते विजय आरगे, जनार्दन कांबळे, आण्‍णासो पुजारी, सुरज कांबळे, सचिन सावंत यांच्यासह क्रांती चौकामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.