वनहक्क दाव्यासाठी श्रमजिवींचे चौथ्या दिवशीही धरणे आंदोलन कायम

दुपारी आणि रात्री आडोशाला चुली पेटवून आंदोलक भुक भागवित आहेत. तर बोचऱ्या थंडीत उघड्यावर रात्र काढीत आहेत.

    वसई । रवींद्र माने : वनहक्क दाव्यांसाठी श्रमजिवी संघटनेच्या महिलांनी सुरु केलेले धरणे आंदोलन चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले असून, मुलभुत अधिकार मिळेपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे.

    वसई प्रांत कार्यालयासमोर वन जमिनीवरील प्लॉट आणि घरा खालील जागा नावावर होण्यासाठी श्रमजिवी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. संघटनेच्या इतिहासात सलग चार दिवस-रात्र हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आदिवासी भगिनी-बंधु मिळेल ते खाऊन प्रांताधिकारी कार्यालयात हजारोच्या संख्येने ठाण मांडून बसले आहेत. दुपारी आणि रात्री आडोशाला चुली पेटवून आंदोलक भुक भागवित आहेत. तर बोचऱ्या थंडीत उघड्यावर रात्र काढीत आहेत.

    आंदोलनाची दखल घेऊन, तिसऱ्या दिवशी उपविभागीय समितीने महापालिका क्षेत्रातील १०९६ आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील १५० दावे मंजूर करुन जिल्हा समितीकडे पाठवण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे १२-१५ वर्षापासून रखडेला हा प्रश्न ५०% निकाली निघाला आहे. आता जिल्हा समितीकडील पटे मिळावीत म्हणून आंदोलन सुरूच आहे. चौथ्या दिवशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रांत अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेतील प्रलंबित वनदावे मागवून ११५१ दावे मंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अजूनही हे दावे मंजूर होऊन मिळाले नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.