आषाढी एकादशीची महापूजा कोण करणार? उद्धव ठाकरे की…; चर्चांना उधाण

राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष होत असतानाच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व राजकीय भूकंपामुळे जर सत्ताबदल झाल्यास यंदा आषाढी वारीची शासकीय महापुजा करण्याचा मान कोणाला मिळणार याबाबत पालखी सोहळयामध्ये आणि भक्ती पंढरीमध्ये चर्चा रंगताना दिसून येत आहे.

    पंढरपूर / नवनाथ खिलारे : राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष होत असतानाच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय अशा प्रकारचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व राजकीय भूकंपामुळे जर सत्ताबदल झाल्यास यंदा आषाढी वारीची (Ashadi Wari) शासकीय महापुजा करण्याचा मान कोणाला मिळणार याबाबत पालखी सोहळयामध्ये आणि भक्ती पंढरीमध्ये चर्चा रंगताना दिसून येत आहे.

    दर आषाढी सोहळ्यातील शासकीय महापुजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री यांना असतो. अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर सर्वचवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी सोहळयातील महापूजा मोठ्या भक्तीभावाने पार पडते. अनेकवेळा राज्यातील विविध प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्ष व संघटनाकडून होत असल्याने आषाढी सोहळ्याच्या कालावधीमध्ये या महापुजेबाबत नेहमीच राजकीय फड रंगल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे प्रत्येक आषाढी सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा महत्वपूर्ण घटना ठरत असते.

    कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढी सोहळा भरत असल्याने मोठ्या भक्तीभावाने व भाविकांच्या वाढत्या संख्येने हा सोहळा साजरा होत असून, यंदाच्या या सोहळ्यातील महापुजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. तर देणगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला होता.

    सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना दिसून येत असून, महाविकास अघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या घटक पक्षांच्या गोटातील राजकीय खलबत्ताना चांगलाचा राजरंग चढु लागला आहे. या सर्व घडामोडीमुळे राज्यातील महाविकास अघाडीच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याची चर्चा तर राजकीय वर्तुळातून होत आहे. परंतु, भाजपच्या अनेक नेत्यांकडून तसा दावाही केला जात आहे. अशा परिस्थितीत जर सत्ता बदल झाला तर मुख्यमंत्री या नात्याने यंदाच्या आषाढी वारीची शासकीय महापूजा करण्याचा मान कोणाला मिळणार की हा सत्तासंघर्ष थंडावला जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच निमंत्रणाप्रमाणे महापूजा करण्याची संधी मिळणार याकडे राज्यातील भाविकांसह पंढरपूरवासियांचे लक्ष लागले आहे.