बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व, अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का

मोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पोपटराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील श्री मयुरेश्वर सर्वधर्म पॅनलने बाजी मारून विरोधी पॅनलचा पराभव केला. या निवडणुकीत सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये पोपट तावरे यांच्या पत्नी अलका तावरे यांनी पुणे मनपाचे उपायुक्त संदिप ढोले यांच्या पत्नी रोहिणी ढोले यांचा पराभव केला.

    बारामती: बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटामध्येच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये अनेक गाव पुढार्‍यांना मतदारांनी धक्का दिला. पळशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली, कुरणेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलचा पराभव झाला.

    मोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पोपटराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील श्री मयुरेश्वर सर्वधर्म पॅनलने बाजी मारून विरोधी पॅनलचा पराभव केला. या निवडणुकीत सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये पोपट तावरे यांच्या पत्नी अलका तावरे यांनी पुणे मनपाचे उपायुक्त संदिप ढोले यांच्या पत्नी रोहिणी ढोले यांचा पराभव केला. वानेवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील हनुमान ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार विद्या सुनील भोसले यांचा गीतांजली दिग्विजय जगताप यांनी पराभव करून पुरुषोत्तम जगताप यांना धक्का दिला. दिग्विजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील चार उमेदवारांनी विजय मिळवला, पुरुषोत्तम जगताप यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनल मधील चार उमेदवारांनी विजय मिळवला तर पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

     

    मुरूम ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनल मधील सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या गटाचे संजय कुमार शिंगटे हे सरपंच पदी विजयी झाले तर मल्लिकार्जुन परिवर्तन पॅनलचे गणपत फरांदे पराभूत झाले. मुरूम ग्रामपंचायत मध्ये तेरापैकी शिंदे गटाचे ६ उमेदवार विजयी झाले, तर विरोधी पी के जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सात जागा जिंकल्या. वाघळवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तरुण सरपंच पदाचे उमेदवार हेमंत गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे यांची सत्ता हस्तगत करून हेमंत गायकवाड सरपंच पदी विजयी झाले. या निवडणुकीत सतीश सकुंडे व त्यांच्या पत्नीचा पराभव झाला.

    पणदरे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये माळेगाव कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तानाजीराव कोकरे, मंगेश जगताप व स्वप्निल जगताप यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार अजय कृष्णा सोनवणे यांनी सत्यजित जगताप व माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे यांच्या नेतृत्वाखालील गीताई पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार प्रसाद सोनवणे यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये १५ पैकी गीताई पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले. इतरही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागून अनेक गाव पुढाऱ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तालुक्यातील तेराही ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटांमध्येच निवडणूक झाली. सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. निवडणुकीचे निकाल लागताच प्रशासकीय भवन परिसरात विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

    मंडल कार्यालयातील कोतवाल झाला सरपंच
    पणदरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनलच्या वतीने मंडल अधिकारी कार्यालयातील मदतनीस अजय कृष्णा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अजय सोनवणे यांनी प्रतिस्पर्धी सरपंच पदाचे उमेदवार प्रसाद सोनवणे यांचा पराभव केला, त्यामुळे मंडल अधिकारी कार्यालयातील मदतनीस असणारे अजय कृष्णा सोनवणे हे सरपंच पदी विराजमान झाले आहेत.