क्षणात स्वप्न जळून खाक झालं! शॉर्टसर्किटमुळे एकर ऊसाला आग लागल्याने शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान

कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. तुकाराम हणमंत पाटील असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

    सांगली : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. तुकाराम हणमंत पाटील असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. तुकाराम पाटील यांचे शेत घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. दिवाळीची धामधूम सुरू होती. दुपारी १२ वाजता त्यांच्या उसाच्या फडाला आग लागल्याची माहिती शेजारील शेतकऱ्यांनी दिली. माहिती मिळताच पाटील शेताकडे गेले, पण आगीने रौद्र रूप धारण केले होते. अखेर काही क्षणातच उसाचा फड जळून खाक झाला.

    शेतात विजेच्या खांबावरून शॉर्टसर्किटमुळे उसाचा फड जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर गावकामगार तलाठी शिवाजी नरुटे, कृषी विभागाचे सहाय्यक डोके यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. या आगीत पाटील यांचे ९१,८०० रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.