एक्स्प्रेस गाडी चालकाने जीव धोक्यात घालून गाडी व पुलाच्या रेलिंगवरून जात ब्रेकचा काढला खटका, व्हिडीओ व्हायरल

आंबिवली दरम्यानच्या उल्हास नदीवर रेल्वेच्या पुलावरून जात असताना अज्ञात प्रवाशाने गाडीतील अत्यावश्यक चैन खेचली. यामुळे गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागल्याने गाडी जागच्या जागी थाबली. मात्र ज्या बोगीतील चैन खेचण्यात आली होती ती बोगी नदीवरील पुलावर होती.

    कल्याण : कल्याणकडून गोरखपूरकडे जाणार्या गोदान एक्स्प्रेसची अज्ञात प्रवाशाने चैन खेचल्याने हि गाडी आंबिवली आणि शहाड दरम्यान थांबली मात्र ज्या बोगीतील चैन खेचण्यात आली होती ती बोगी नदीवरील पुलावर थांबल्याने ती चैन सुस्थितीत आणण्याचे आव्हान रेल्वेसमोर उभे ठाकले होते. अखेर गोदान एक्स्प्रेसचे लोकोल पायलट ए आर मिश्रा यांनी आपला जीव धोक्यात घालून गाडीखालील पुलाच्या रेलिंगवरून जात ब्रेकचा खटका वर केला यानंतर गाडी मार्गस्थ झाली.

    कल्याण कडून गोरखपूरकडे जणारी गोदान एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून मार्गस्थ झाली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हि एक्स्प्रेस शहाड आणि आंबिवली दरम्यानच्या उल्हास नदीवर रेल्वेच्या पुलावरून जात असताना अज्ञात प्रवाशाने गाडीतील अत्यावश्यक चैन खेचली. यामुळे गाडीला इमर्जन्सी ब्रेक लागल्याने गाडी जागच्या जागी थाबली. मात्र ज्या बोगीतील चैन खेचण्यात आली होती ती बोगी नदीवरील पुलावर होती.

    रेल्वेचा नदीवरील पूल केवळ पटरी इतकाच असल्याने या पुलावर उभे राहणे अशक्य असल्याने गाडीखाली जाऊन ब्रेकचा खटका वर करायचे आव्हान होते. अखेर गाडीचे लोको पायलट यांनी चालकाची परवानगी घेत गाडीला लटकून खाली जात त्यांनी खटका वर केल्यानंतर हि गाडी मार्गस्थ झाली. हा सर्व प्रकार त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या एका साथीदाराने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ काढला असून त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्यांनी मिश्रा यांच्या धाडसाचे कौतुक करतानाच प्रवाशांनी कारण नसताना आपल्याबरोबर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशाचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केले आहे.