महामार्गावरील खड्डे चुकवताना संतुलन बिघडल्याने डंपर झाला पलटी

मुंबई-बंगळूर महामार्गावरील खड्डे चुकवताना वाहनावरील ताबा सुटून संतुलन बिघडल्याने डंपर पलटी झाला. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास वाकड येथील मुळा नदीच्या अलिकडे घडली.

    पिंपरी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील खड्डे चुकवताना वाहनावरील ताबा सुटून संतुलन बिघडल्याने डंपर पलटी झाला. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास वाकड येथील मुळा नदीच्या अलिकडे घडली. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेनंतर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी हातात खोरे-घमेले घेऊन हे सर्व खड्डे खडी-मुरूम टाकून बुजविले आहेत.

    मिळालेल्या महितीनुसार काल दुपारी एम १४, डीएम २९६१ क्रमांकाचा डंपर क्रशसॅन्ड घेऊन वाकडहुन साताराच्या दिशेला जात होता, तेव्हा रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालकाने अर्जंट ब्रेक दाबून लेन बदलण्याचा प्रयत्न केल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडल्याने तो रस्त्यात पलटी झाला. त्यामुळे भूमकर चौक ते वाकड चौका दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियमन केले. दोन क्रेनला पाचारण करून क्रेनच्या सहायाने डंपर सरळ करण्यात आला.

    यानंतर हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी पोलीस कर्मचारी, वार्डन यांच्या मदतीने ह्या रस्त्यातील मोठे खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे तात्पुरता का होईना वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र महामार्ग प्रशासनाने अपघात घडण्याची वाट न बघता अशा धोकादायक खड्ड्यांची पाहणी करून ते बुजवावेत अशी मागणी कुबडे यांनी केली.