अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ! ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल

अजित पवार यांनी बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारावेळी केलेल्या एका वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

  मुंबई : सध्या लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरु आहे. आज (दि.19) लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्पातील मतदान पार पडत आहे. राज्याच्या इतर भागामध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दरम्यान महायुतीमधील नेते अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारावेळी केलेल्या एका वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या वक्तव्याच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.

  काय म्हणाले होते अजित पवार?

  बारामतीच्या उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी जंग जंग पछाडले आहे. इंदापूरमध्ये अजित पवार यांनी वकिल आणि डॉक्टर यांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार म्हणाले, काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू. पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण कचाकचा दाबा, म्हणजे याने मलाही बरे वाटेल. तर मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता होईल. निधी मिळाला नाही तर मला बोलू नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं” यावरुन महाविकास आघाडीने टीकेची झोड उठवली होती.

  विरोधकांकडून टीकेची झोड

  शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. सोशल मीडियावर या वक्तव्याची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील अजित पवार यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोग दखल का घेत नाही हे प्रलोभन नाहीये का? असा सवाल उपस्थित केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  अजित पवार यांचे स्पष्टीकरण

  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या वाक्यात ध चा मा केला गेला. मी हे सर्व गमतीत म्हटलो होतो. मी कायम विचार करून विचारपूर्वक बोलततो,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.