प्रकल्पग्रस्त शेतकरी झाले आक्रमक, सावडाव धरणाचे काम पाडले बंद

जो पर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही; ठेकेदाराच्या मशिनरी, डंपर काढले बाहेर

    कणकवली : फोंडाघाट मृद आणि जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम शेतकऱ्यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर दांडगाईने काम चालु ठेकेदाराने केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जाऊन ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले. त्याच्या मशिनरी, डंपर धरण परिसरातून संतप्त शेतकऱ्यांनी बाहेर काढायला भाग पाडले. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष कन्हैया पारकर आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे.

    प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सावडाव धरण 2 चे उ‌द्घाटन झाल्यावर एक महिन्यांच्या आत प्रत्येक प्रकल्पग्रस्तास त्यांच्या भूसंपादित जमिनीतील झाडे, बांधकाम, विहीर, जमिनीतील इतर बाबींचा तसेच जमिनीचा किती, कधी आणि कोणत्या प्रकारे मोबदला मिळणार याबाबत लेखी स्वरूपात पत्र देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करताच धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराला हाताशी धरून फोंडाघाट मृद आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि घुसखोरी करून परस्पर धरणाचे काम करत आहेत. असा आरोप करत सावडाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरण परिसरात जाणून आंदोलन छेडले.

    यावेळी महिला शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये ‘आमचा हक्क मिळालाच पाहिजे….. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘स्वाभिमानी शेतकऱ्यांचा विजय असो’, ‘कोण म्हणतंय देणार नाय…घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा जोरदार घोषणा प्रकल्पग्रस्तांनी दिल्या. आमचा धरणाला विरोध नाही – प्रकल्पग्रस्त शेतक-यांना किती आणि केव्हा मोबदला मिळणार याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. केवळ संयुक्त मोजणी करण्याबाबत नोटीसा शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र येथील नुकसान भरपाई काय मिळणार कोणत्या स्वरुपात मिळणार? याबाबत स्पष्ठ लेखी दिलेले नाही. ठेकेदाराला हाताशी धरुन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.

    शिवसेना उबाठा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार – कन्हैया पारकर

    शिवसेना उबाठा पक्षाकडून या शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठींबा देण्यात आला. आमचा धरणाला विरोध नसून मुळ शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात आणि जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देता जमीनीमध्ये धरणाचे जे काम चालु आहे ते चुकीच्या पध्दतीने चालु आहे. त्याचे मुल्यांकन न करताच झाडे आणि जमीन उध्वस्त करण्याचे काम केलं जात आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढील काळात आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. अधिकारी आणि ठेकेदाराने धरणाचे काम करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. केवळ या ठेकेदारीतून पैसे खाण्यासाठी केलेला आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी दिला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख निलम पालव सावंत, राजु राठोड, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सावडाव धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

    सावडाव धरणाचे काम बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी धरण परिसरामध्येच आंदोलन छेडले. ठेकेदाराच्या प्रतिनीधीला आमचा मोबदला मिळाला नसल्याने काम बंद करा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. परंतु ठेकेदार मानत नसल्याने शेतक-यांनी गांधीगीरी करत ठेकेदाराचे चक्क पाय धरले.