श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या महोत्सवास कोठी पूजनाने प्रारंभ; आरास पाहण्यासाठी भाविकांची  गर्दी

श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या 110 व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज पहाटे कोठी पूजनाने प्रारंभ झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.     

  दहिवडी : श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या 110 व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज पहाटे कोठी पूजनाने प्रारंभ झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

  ब्रम्हानंद महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसारच येथील समाधी मंदिर समितीच्या वतीने मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमीपर्यंत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज पहाटे समाधी मंदीर परिसरातील मुख्य सभामंडपात सकाळी साडेसहा वाजता वेदघोष ईशस्तवन आणि सुमुधुर गायनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्री ब्रम्हचैतन्य महाराज व श्री ब्रम्हानंद महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  समाधी मंदिर समितीचे विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे मध, दूध, दही, चंदन, पंचामृत याने लेप देत गरम पाण्याने स्नान घालण्यात आले व पूजन झाल्यानंतर अक्षय पिशवीतील (बटवा) पैशाना पंचामृताने अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गोशाळेत गाईंचे पूजन करण्यात आले. त्यांना प्रसाद खाऊ घालण्यात आला. तसेच कोठीपूजन करण्यात आले. स्वयंपाकघरातील चुलींचे देखील पूजन करण्यात आले. स्वयंपाक गृहात स्वयंपाकसाठी लागणाऱ्या ताट, मोठी पातेली, वाट्या, चमच्या, पळी भात, वाडी या वस्तूंची आरास करण्यात आली.

  स्वयंपाकघरातही भट्ट्यांचे पूजन करण्यात आले. ढबू मिरची, लिंबू, काकडी, तोंडली, डाळिंब, सफरचंद, डांगडा, भोपळा, गाजर तसेच कडधान्य यांची दैदिप्यमान आरास करण्यात आली. मुख्य मंदिरात सुद्ध फुलांची आणि पणत्यांची आरास केलेली होती. कोठीपूजनाच्या या कार्यक्रमानंतर मुख्य समाधी मंदिरात अखंड पहारा बसविण्यात आला.

  श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समाधी मंदिरात अखंड रामनाम, अखंड पहारा, समाधीस रुद्राभिषेक, श्री रामपाठ व श्री विष्णु सहस्त्रनाम, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत.

  फळे-भाज्यांच्या वापरातून आकर्षक आरास

  कोठीपूजनानिमित्त यंदाही कोठीमध्ये विविध वस्तू, फळे, भाज्यांच्या वापरातून आकर्षक आरास करण्यात आली होती. स्वयंपाकघरातही विविध लहानमोठी भांडी व वस्तू वापरुन आकर्षक मांडणी करण्यात आली होती. या आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.