आमदार अपात्रतेप्रकरणी नागपुरात होणार अंतिम सुनावणी; 11 ते 20 डिसेंबरदरम्यान सुनावणीची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर हिवाळी अधिवेशन काळातदेखील नागपुरात नियमित स्वरूपात सुनावणी होणार आहे.

  नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर हिवाळी अधिवेशन काळातदेखील नागपुरात नियमित स्वरूपात सुनावणी होणार आहे. 11 ते 20 डिसेंबरदरम्यान नागपुरात अंतिम सुनावणी होईल. गरजेनुसार 21 आणि 22 डिसेंबरलासुद्धा सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

  यासंदर्भात नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांसोबत चर्चा केली असल्याचे कळते. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांना निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे अधिवेशन काळातही सुनावणी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  सामंत, केसरकरांची साक्ष; उलटतपासणीकडे लक्ष

  नागपुरात उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. शिवसेनेचे तत्कालीन प्रतोद आणि आताचे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारून भांबावून सोडले. आता शिंदे गटाच्या सदस्यांची साक्ष घेतली जाणार आहे. त्यांनाही ठाकरे गटाच्या वकिलांकडून घेतल्या जाणाऱ्या उलटतपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रक्रियेला वेळ लागू शकेल, असा कयास लावला जात आहे.

  ‘त्या’ मेल आयडीबाबत आक्षेप

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप बजावला त्या मेल आयडीबाबतही आक्षेप नोंदविला गेला. त्यावर बरीच चर्चा झाली. ठाकरे गटाची तयारी लक्षात घेता शिंदे गटातील सदस्यांसाठीही साक्षनोंदणी परीक्षेप्रमाणेच ठरण्याची शक्यता आहे.