सिध्देश्वर साखर कारखाना चिमणी पाडकामबद्दलचा अंतिम आदेश रद्दबातल

कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामसंदर्भात 24 ऑगस्ट 2019 रोजी झालेला अंतिम आदेश नागरी विमान वाहतूकचे महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) अरुणकुमार यांनी आज रद्दबातल ठरविला आहे.

  सोलापूर : कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामसंदर्भात 24 ऑगस्ट 2019 रोजी झालेला अंतिम आदेश नागरी विमान वाहतूकचे महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) अरुणकुमार यांनी आज रद्दबातल ठरविला आहे. कारखान्याचे सर्व मुद्दे विचारात घेतल्याशिवाय चिमणी पाडकामाची घाई करणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
  नागरी विमान वाहतूकचे तत्कालीन उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन)चे डी. सी. शर्मा यांनी 24 ऑगस्ट 2019 रोजी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा 52 मीटर उंचीचा भाग पाडण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात कारखान्याने नागरी विमान वाहतूकचे महासंचालक अरुणकुमार यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यावर शर्मा यांनी दिलेला आदेश अरुणकुमार यांनी 3 डिसेंबर 2019 रोजी कायम ठेवला होता. त्याविरोधात कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने कारखान्याची बाजू ऐकून घेण्यासाठी फेरसुनावणी घेण्याचा आदेश सिव्हिल एव्हिएशनला दिला होता. त्यानुसार सिव्हिल एव्हिएशनने फेरसुनावणी घेतली होती. तसेच 17 ऑगस्ट 2022 रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या अधिकार्‍यांच्या पथकाने सिध्देश्वर साखर कारखाना आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) चिमणींची पाहणी करून महासंचालकांना अहवाल सादर केला होता. कारखान्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महासंचालक अरुणकुमार यांनी सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची घाई करू नये, असा स्पष्ट आदेश देत नव्याने आढळून आलेले सगळे मुद्दे फेर सर्वेक्षणात विचारात घेण्याचा हुकूम सिव्हिल एव्हिएशनचे सहसंचालक शर्मा यांना दिला आहे.

  सिव्हिल एव्हिएशनचा निर्णय स्वागतार्ह
  नागरी विमान वाहतूकचे महासंचालक अरुणकुमार यांनी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबत आज जो आदेश दिला आहे तो स्वागतार्ह आहे. या आदेशामध्ये 24.8.2019 रोजी त्यांनी दिलेला अंतिम आदेश रद्दबातल ठरवत सिव्हिल एव्हिएशनचे सहसंचालक (जनरल) डी. सी. शर्मा यांच्याकडे फेरसर्वेक्षण करून योग्य निर्णय देण्यासाठी परत पाठविला आहे व चिमणी पाडकामाबाबत कुठलीही घाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.यावरून मला व सिध्देश्वर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला बदनाम करणार्‍या विकास मंचाची भूमिका किती चुकीची व फोल होती याची प्रचिती सोलापूरकरांना पुन्हा एकदा आली आहे.

  या निर्णयामुळे आता सोलापूरच्या विकासाच्यादृष्टीने बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी जमीन महाराष्ट्र शासनाने खरेदी करून संपादित केलेली आहे व तोच आज सोलापूरच्या पुढील विकासासाठी महत्त्वाचा निर्णय होणार आहे.

  मी या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना आवाहन करतो की, यासाठी व्यक्तिगत द्वेष, राजकारण व कोर्टकचेरीत वेळ घालवण्यापेक्षा बोरामणी विमानतळ होण्यासाठी प्रयत्न करणे शहाणपणाचे असून त्यासाठी पुढे आले पाहिजे. ते सोलापूरच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने योग्य होणार आहे.

  धर्मराज काडादी, सिध्देश्वर साखर कारखाना