ज्या फिक्स्ड डिपॉझिटवरुन मोदी-फडणवीसांची बीएमसी सत्ताधाऱ्यांवर टीका, त्या एफडी आहेत तरी किती रक्कमेच्या? वाचा…

पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटवरुन पंतप्रधान मोदी पालिकेतील सत्ताधारी यांच्यावर टिका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी देखील पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटवरुन बीएमसी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळं पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

    मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. दरम्यान, सर्व विकासकामांचे मोदींनी लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत, विविध विकासकामे आगामी काळात मुंबईत दिसतील, असं म्हणत शिंदे-फडणवीसांचे कौतूक केले. तसेच यावेळी त्यांनी मुंबईत ४०० कि.मी काँक्रेटचे रस्ते बनविणार असल्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक जलदगतीने व सुखकर होईल, तसेच पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटवरुन पंतप्रधान मोदी पालिकेतील सत्ताधारी यांच्यावर टिका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी देखील पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटवरुन बीएमसी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळं पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

    किती आहे फिक्स्ड डिपॉझिट?

    देशात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. विविध बँकांतील महापालिकेच्या ठेवींचा आकडा तब्बल ७९ हजार कोटींवर पोहोचला आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी या ठेवी राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, करोडो रुपये बँकांमध्ये असेच पडून राहत असल्याने, या वर्षी काही रकमेची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या आहे. तसेच आगामी काळात या फिक्स्ड डिपॉझिटचा वापर विकासकामांसाठी करायचा असं शिंदे-फडणवीस सरकारचा विचार आहे. मुंबई महापालिकेच्या कॅनरा बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आदी बँकांमध्ये जून, २०१९ पर्यंत ७९ हजार ९१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

    …तर भिकेला लागेल – ठाकरे

    मुंबई पालिकेत ८९ हजार कोटींच्या एफडी आहेत. त्यांचा वापर विकासासाठी व्हायला हवा, असं मोदी, फडणवीसांनी म्हटले आहे. यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीही परवा ४०० किमी रस्त्यांच्या कामावर टीका करताना या एफडी मोडाव्या लागतील, तर मुंबई महापालिका भीकेला लागेल अशी टिका शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

    हजारो कोटींची वाढ

    पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये मागील दोन वर्षांत तब्बल १२ हजार कोटींची वाढ झाली आहे. २०१९-२०चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा होता. या मुदत ठेवींमध्ये २१ हजार कोटींची रक्कम ही ठेकेदारांची अनामत रक्कम, पालिका कर्मचारी-अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटीचा यात समावेश आहे. कोस्टल रोड, गोरेगाव- मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प, प्रस्तावित पाणी प्रकल्प आदींसारख्या प्रकल्पांसाठी तब्बल ५० हजार कोटींहून अधिक रक्कम ठेवण्यात आली आहे. पालिकेची राज्य शासनाकडे विविध करांपोटी तब्बल ४३३१.३४ कोटींची थकबाकी आहे, तर पालिका आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला काही कोटी रुपयांची आर्थिक मदत करीत आहे.