दोन आमदारांनी ताकद लावलेल्या खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

सातारा जिल्ह्यात ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतमोजणी दरम्यान या सर्व ग्रामपंचायतच्या मतमोजणीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

    सातारा जिल्ह्यात ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतमोजणी दरम्यान या सर्व ग्रामपंचायतच्या मतमोजणीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आ.महेश शिंदे विरुद्ध आ.शशिकांत शिंदे अशी थेट लढत झाली यामध्ये सर्वात मोठी असलेल्या खेड ग्रामपंचायतीवर सत्तांतर करत आ.महेश शिंदे यांनी आपले १२ उमेदवार निवडून आणले आहेत. तर आ शशिकांत शिंदे गटाला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. याचबरोबर आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला करिश्मा दाखवत उपली ग्रामपंचायतीत ७ पैकी चार जागा बिनविरोध केल्या होत्या. तर, दोन जागांवर लागलेल्या निवडणुकीत त्यांच्याच विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीत एक जागेवर ओबीसी आरक्षण असल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र निवडणूक झालेल्या सर्व जागा आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या विचाराचे उमेदवार विजयी झाल्या झाल्याने त्यांची सत्ता या ग्रामपंचायतीवर आली आहे.

    याच बरोबर जिल्ह्यातील इतर ५ ग्रामपंचायतीचे निकालात जाहीर झाले असून आ.शशिकांत शिंदे विचाराच्या पॅनेलला चिंचनेर निंब आणि खिंडवडी ग्रामपंचायतीवर सत्ता राखता आली आहे. सातारचे खा.उदयनराजे यांच्या विचारांचे पॅनल संभाजी नगर ग्रामपंचायतीत निवडून आल्याने या ग्रामपंचायतीवर खा.उदयनराजे यांची सत्ता आली आहे. आ.महेश शिंदे यांनी खेड बरोबर गोजेगावत देखील सत्ता आणल्याने त्यांच्या विचाराच्या पॅनलला या दोन ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करता आली आहे. सातारा तहसील कार्यालयात सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाली असून या मतमोजणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी विजयी उमेदवारांनी सातारा शहरातून विजयी रॅली कडून गुलालाची उधळण केली.