तासगावात इच्छुकांचे देव पाण्यात ! दिग्गजांची अडचण ; पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू; महाविकास आघाडीचा प्रयोग ?

  तासगाव : तासगाव नगरपालिका आरक्षण जाहीर करण्यात आले असून,त्यानंतर आता अनेकांचे मनसुबे ढासळले आहेत.  अनेक इच्छुकांनी आता देव पाण्यात घातले आहेत. आरक्षणानंतर दिग्गजांनी ज्या प्रभागातून तयारी केली होती तिथेच अडचण झाली आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.

  तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यंदा नगरपालिकेचे 2 प्रभाग वाढवण्यात आले आहेत. पूर्वीच्या 10 प्रभागाचे आता 12 करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील प्रभाग रचनेत बराच बदल झाला आहे. प्रभाग 11 व 12 मध्ये अनुसूचीत जातींसाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे या भागातील खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते दिग्विजय पाटील व रोहन कांबळे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. अन्य प्रभागात देखील इच्छुक उमेदवारांना यंदा जोरदार तयारी करावी लागणार आहे. सर्वसाधारण पुरुष आणि महिलांसाठी 11 जागा राखीव आहेत. वॉर्ड रचना पाहता याचा फायदा सत्ताधारी भाजपला होणार की, अन्य पक्षांना होणार याकडे लक्ष लागले आहे.

   यंदा परिस्थिती वेगळी
  प्रभाग 1 मध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक बाबासाहेब पाटील व शिवसेनेचे राजू मुल्ला, राष्ट्रवादीचे अभिजीत माळी तयारीत आहेत. गतवेळच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. दरम्यान आता परिस्थिती वेगळी आहे.  प्रभाग 2 मधून युवानेते राजेंद्र चव्हाण यांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचेच अरुण साळुंखे व  राष्ट्रवादीचे करण पवार हे देखील तयारीत आहेत. प्रभाग 3 मधून माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे अविनाश पाटील इच्छुक आहेत. महाविकास आघाडी झाल्यास इथून त्यांचे नाव येण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपकडून या ठिकाणाहून विद्यमान नगरसेवक जाफर मुजावर उमेदवार असतील. प्रभाग 4 मधून भाजपचेच शरद मानकर व किशोर गायकवाड तयारीत आहेत. प्रभाग 5 मधून भाजपचे अनिल कुत्ते, शिवसेनेचे विशाल शिंदे जोरदार तयारीत आहेत. प्रभाग 6 मधून यंदा काँग्रेसला बळ मिळणार असे सद्या चित्र दिसत आहे. प्रभाग 7 मधून शिवसेनेचे सुशांत पैलवान, राष्ट्रवादीचे अमोल शिंदे तयारीत आहेत. प्रभाग 8 मधून यंदा भाजप व राष्ट्रवादी पैकी कोणाला अधिक ताकद मिळतेत हे पहावे लागेल. प्रभाग 9 ते 12 मध्ये भाजपला संधी असल्याचे चित्र दिसत असले तरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, अजय पवार यांनी जोरदार ताकद लावली आहे. निवडणूक पूर्व तयारीत आघाडीवर असलेल्या इच्छुकांना पर्यायाने प्रभाग बदलणे किंवा महिला उमेदवार देणे असे दोनच पर्याय त्यांच्याकडे राहिले आहेत.

  दरम्यान, काही दिवसांतच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार, असून राजकीय पुलाखालुन अजून बरचस पाणी जाणार आहे. वेगवेगळ्या पक्षाकडून इच्छूक असलेल्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे संधी व नंतरची नाराजी हे संभाळणे नेत्यांपुढच खर आव्हान आहे.

  नगरपंचायतीत राष्ट्रवादीवर सेटलमेंटचा आरोप
  कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या एकतर्फी यशाचे चित्र पाहून तिथे खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांनी सेटलमेंट केल्याचे आरोप झाले. मात्र आता तासगावात अशी परीस्थिती दिसत नाही. रोहित पाटील यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तासगांव नगरपालिका निवडणुकीचे  मोठे  आव्हान  असणार आहे.  नेतृत्वाची खरी कसोटी तासगांवमध्ये पाहायला मिळणार आहे.

  घटकपक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
  राज्यातील सत्ताधारी असणाऱ्या महविकास आघाडीकडून भाजपला सर्वच निवडणुकीत पराभूत करणाची  व्यूहरचना आहे. त्यामुळे तासगांव नगरपालिका निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा निर्णय घेणार का ?  अन्य घटकपक्षांची भूमिका काय असणार, यामुळे तासगावात अजून काय काय होणार याकडे लक्ष लागले आहे.