
आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. हा आरक्षणाचा लढा चालु असतानाच सर्व मंत्री, सरकार झुकले आहे मात्र मराठा समाजाच्या हितासाठी एक इंचभरही नियत ढळू दिली नसून मरेपर्यंत समाजाशी गद्दारी करणार नाही, असे प्रतिपादन जरांगे पाटील यांनी केले.
भोर : सत्तर वर्षापूर्वी मराठा समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण तेव्हाच दिले असते, तर आज देशात सर्वात जास्त प्रगत जात म्हणून मराठ्यांची ओळख असती. त्यासाठी वेळोवेळी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या त्यांनी त्यावर कामेही केली, केवळ पुरावे सापडत नाहीत म्हणून सांगण्यात आले. त्यावर मराठ्यांनी विश्वास ठेवला, त्यामुळेच मराठा समाजाचा विश्वासघात झाला असून, मराठा समाज ओबीसीमध्ये असल्याचे पुरावे सत्तर वर्षांपासून लपवून ठेवले गेले. स्वतःच्या बुडाखाली आरक्षणाचे पुरावे दाबून ठेवून या नेत्यांनी मराठ्यांच्या लेकरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.
मराठ्यांना आरक्षण मिळू नये, म्हणून षडयंत्र सुरू आहे. आरक्षणासाठी आपण सर्वांनी जी वज्रमुठ बांधून लढा उभा केला आहे तो कायम ठेवून आरक्षण मिळेपर्यंत आता थांबायचे नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. हा आरक्षणाचा लढा चालु असतानाच सर्व मंत्री, सरकार झुकले आहे मात्र मराठा समाजाच्या हितासाठी एक इंचभरही नियत ढळू दिली नसून मरेपर्यंत समाजाशी गद्दारी करणार नाही, असे प्रतिपादन जरांगे पाटील यांनी केले.
भोर शहरातील विद्यानगर येथील शेटे मैदानात भोर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी (दि.१९) संध्याकाळी आयोजित केलेल्या सभेत जरांगे पाटील बोलत होते. सभेच्या प्रारंभी शिवतीर्थ चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे व ज्यांना अद्याप नाही, त्यांनी एकमेकांना आधार देत सोबत राहायचे आहे. आजही खेडो पाड्यात ओबीसी समाज व मराठा समाज एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र सहभागी असतो. नाही तर काही लोक राजकीय स्वार्थापोटी तुम्हाला भडकावतील दोन समाजात तेढ निर्माण करतील, दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असून तूम्ही सावध रहा, संयम बाळगावा, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, मतभेद निर्माण करण्यासाठी टोकाच्या अफवा पसरवतील, मात्र आपण याला बळी पडू नका. आपले ध्येय एकच आहे आपल्या लेकरा बाळांना आरक्षणचा लाभ मिळवून देणे त्यांना मोठे झालेले पाहणे.
यावेळी बोलत असताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सरकारशी बोलणे झाले आहे. आजपर्यंत एकोणतीस लाख लोकांचे पुरावे सापडले असून ज्यांचे पुरावे सापडले आहेत त्यांच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना व सोयरे संबंधित नातेवाईकांना सरसकट दाखले देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकजुटीत फूट पडू देऊ नका, उद्रेक होऊ देऊ नका व आत्महत्या करु नका, असे आवाहन यावेळी केले.
1 डिसेंबर पासुन गावोगावी साखळी उपोषण
आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा संपत आली असून भेटे पर्यंत हा संघर्ष चालूच राहण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात दरोरोज साखळी उपोषणाला सुरुवात झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोरच्या मावळ्यांना खोचक सवाल
ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या मावळ प्रांतातील मराठा बांधवांनी कोणताही भेदभाव न करता सर्व पक्षीय नेत्यांना मोठे केले त्यां नेत्यांनी पदाबरोबरच स्वतःच्या मालकीच्या गाड्या, पैसा, जमिनी कमावल्या, ते समाजात साहेब झाले, पुढे मुलांना राजकीय सत्तेत आणून त्यांचा उद्धार केला, त्यांची पिढी देखील नावारूपाला आली ते सर्वांसाठी दादा झाले. त्यांनीही तेच केले मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठविले व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यालाही प्रसिद्धीच्या झोतात आणून समाजासाठी भैय्यासाहेब केले, तरीही मावळातील मराठ्यांनी साथ दिली डोक्यावर घेतले त्यांचे फ्लेक्स देखिल लावले. किती दिवस त्यांच्याच घोंगड्या उचलायच्या. आता खऱ्या अर्थाने ह्या राजकारण्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून साथ देणे गरजेचे आहे मात्र आता मराठा समाजावर वेळ आलीय तर त्याचं भैय्या साहेबाना समाजाचे दायित्व म्हणुन गावोगावी जाऊन किती पत्रक वाटली व पुढे जाऊन समाजासाठी वाटताहेत का? अन्यथा त्यांना डोक्यावर घेण्याची गरज काय ?..असा खोचक सवाल स्थानिक राजकारणाविषयी यावेळी केला.