The government has risen on the lives of farmers! Not only orders for purchase of paddy but also change in procurement limits, intense anger among farmers

रब्बी हंगामात दरवर्षी १ मे पासून ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. मात्र, यंदा १५ मे पर्यंतही धान खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. तर, रब्बी पिकासाठी धान मळणीचे काम जोरात सुरू आहे. त्यातच पुढील महिन्यात ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे.

    गोंदिया : शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धानाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. धान विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ हजारच्या वर शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. असे असताना शासनाकडून जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेशच देण्यात आले नाही. १ मे पासून धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असताना १५ दिवसाचा कालावधी लोटूनही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यातच धान खरेदीच्या मर्यादेतही बदल करण्यात आले असून आता हेक्टर ऐवजी प्रति शेतकरी ८ क्विंटलप्रमाणे धानाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष पसरलेला आहे. तर, शासनच शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याच्या प्रतिक्रीया जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत.

    जिल्ह्यात यावर्षी ६८ हजार ७१४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्यामधून यंदा २६ लाख क्विंटल धानाचे उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यातील १०७ धान खरेदी केंद्रांद्वारे शासकीय आधारभूत दराने धानाची खरेदी केली जाते. यासाठी या केंद्रांवर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम संबंधित केंद्रावर नोंदणी करावी लागते. यानुसार जिल्ह्यात यावर्षी ३० एप्रिलपर्यंत निर्धारित वेळेत ५८ हजार १२० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. तर यंदा जिल्ह्यात पणन महासंघाकडून ४ लाख ८० हजार क्विंटल धानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

    तसेच शासनाकडून यंदाच्या हंगामात प्रति शेतकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत. तसेच धान खरेदीची मर्यादा प्रति हेक्टर ऐवजी प्रति शेतकरी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर एकूण उत्पादन व खरेदीसाठी निश्चित केलेल्या मर्यादेच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करून प्रति शेतकरी आठ क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

    शेतकऱ्यांची चिंता वाढली

    रब्बी हंगामात दरवर्षी १ मे पासून ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. मात्र, यंदा १५ मे पर्यंतही धान खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. तर, रब्बी पिकासाठी धान मळणीचे काम जोरात सुरू आहे. त्यातच पुढील महिन्यात ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. तेव्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागतील. यंदा मान्सूनही लवकर सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे वेळेत धानाची विक्री होणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.