आमच्याच कामांचे श्रेय खोके सरकार घेतंय; कर्नाटकातून येताना बेळगावसह…,सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मोदींना खोचक सवाल, म्हणाले…

पंतप्रधान मोदींना कर्नाटकमधून येताना बेळगावसह सीमाभागात अत्याचार सुरू आहेत त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात घोषणा करावी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींच्या आजच्या दौऱ्यावर देखील टिका केली आहे.

  मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. तत्पूर्वी ते कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत आहेत. परंतु भाजप (BJP) सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना राज्याची व मुंबईची या सरकारने काय दशा करुन ठेवलीय असं खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) टिका केलीय. तसेच पंतप्रधान मोदींना कर्नाटकमधून येताना बेळगावसह सीमाभागात अत्याचार सुरू आहेत त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात घोषणा करावी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींच्या आजच्या दौऱ्यावर देखील टिका केली आहे.

  आमच्या कामांचं श्रेय खोके सरकार घेतंय…

  दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे घटनाबाह्य सरकार, खोके सरकार आमच्या कामांच श्रेय घेतंय. शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिकेने जी कामे केली आहेत, त्या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. यातच शिवसेनेचं यश आहे. आम्हाला त्याचा आनंद आहे. शिवसेनेमुळे ज्या कामांना गती मिळाली त्या कामांचं उद्घाटन करून मोदी प्रचारांचं भूमिपूजन करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

  …तर प्रतप्रधानांनी घोषणा करावी

  पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येण्यापूर्वी कर्नाटकातून येत आहेत, यावर राऊत यांनी टिका केली. सीमावादाप्रश्नी दोन्ही राज्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अद्यापही शमलेला नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन्ही राज्यांनी शांततेत वाद सोडवावा असे आदेश केंद्राने म्हटलं आहे. कर्नाटक सीमाभागात अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकातून येताना याबाबत तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.

  महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवला…

  दरम्यान, काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळय़ा भाजप वाजवणार. पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

  पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे व येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूंवर असे हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो! आहेच!! अशी बोचरी टिका आज सामनातून करण्यात आलेली आहे.