
टेंभूच्या पाण्यासाठी मायलेकाचे उपाेषणास्त्र
सांगली : जोपर्यंत टेंभू योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा अामदार सुमन पाटील यांनी घेतला आहे. सरकारने घोषणा करून फसवणूक करू नये, तत्काळ कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अठरा गावाना तत्काळ टेंभू योजनेतून पाणी देण्याच्या मागणीसाठी आमदार सुमनताई आर. आर. पाटील सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (दि. २) आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार संजय पाटील यांनी आमदार सुमन पाटील या पुत्रप्रेमाने आंधळ्या झाल्या आहेत, अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील म्हणाल्या, खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रेम उफाळून आले आहे. परंतू तासगाव, कवठेमहकांळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन योजनेचे पाणी देण्यासाठी काहीच केले नाही
रोहित पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील सावळज, सिध्देवाडी, जरंडी,यमगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी, घाटनांद्रे, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी या गावात अजूनही टेंभूचे पाणी पोहोचले नाही. दुष्काळ पडला की, शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. पाणी सोडा म्हंटल की, भीक दिल्यासारखे पाणी दिले जाते. आम्ही हक्काचं पाणी मागत आहे. परंतू पाणी देण्यास पाटबंधारे विभाग टाळाटाळ करत आहे. परंतू जोपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.दरम्यान, उपाेषणाला पाठींबा देण्यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांनी भेटी दिल्या. यामध्ये भाजपकडून दमाजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भेटीला आल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू होती.
खासदारांना श्रेय घेऊ नये
विशाल पाटील म्हणाले, खासदारांना पाण्याचे श्रेयवाद घेण्याची आवश्यकताच नाही. तुमचे कर्तृत्स काय आहे, हे सांगली जिल्ह्याला चांगलेच माहित आहे. दुष्काळी भागात पाणी पोहोचले की, खासदार नारळ फोडायला लगेच हजर होतात. पाणी योजनांसाठी खासदारांनी किती निधी दिला. निधी राज्यातून नाही तर केंद्रातून आणायचा असतो. त्यांच्या पक्षातच खासदारांचे महत्व किती आहे, हे आता पक्षातील नेत्यांना लक्षात आले आहे.
भागातील शेतकरी माझी लेकरं
या भागातील शेतकरी आणि त्यांची मुलं ही माझी लेकरं आहेत. त्यांचे हित जोपासण्यासाठी मी आंधळी झाली आहे. शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी मी त्यांच्यामागे ठाम उभी आहे. माझ्या मुलाचं हित जनता बघेल, असा टोला आमदार सुमन पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना लगावला.
राजकारण करण्याचा प्रयत्न
रोहित पाटील म्हणाले, जिल्ह्यातील काही लोक पाण्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी कोणी दिले हे जनतेला माहित आहे. परंतू तासगाव आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील अनेक गावे पाण्याचापासून वंचित आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही.